लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आयसीटी अर्थात रसायन तंत्रज्ञान संस्थेची मुहूर्तमेढ शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रोवण्यात येणार आहे. ही संस्था मराठवाड्यातील उद्योगांसाठी कुशल मनुष्यबळाची निर्मिती करण्यात सिंहाचा वाटा उचलणार असून, यामुळे उद्योगवाढीला चालना मिळणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी गुरूवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता सिरसवाडी परिसरात आयसीटी संस्थेच्या कोनशिलेचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार असून, त्यानंतर वृंदावन हॉलमध्ये जााहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खा. संजय जाधव, आ. राजेश टोपे, आ. संतोष दानवे, आ. नारायण कुचे, आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, आ. सुभाष झांबड, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, जि.प. अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, आयसीटीचे कुलगुरू डॉ. जी.डी. यादव, कुलपती रघुनाथ माशेलकर आदींची उपस्थिती राहणार आहे. जालन्यात ही संस्था यावी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आपण स्वत:, येथील उद्योजक आणि कुलगुरू डॉ.जी.डी यादव यांनी पाठपुरावा केला. त्याचे आज चीज होणार असल्याने मोठे समाधान वाटत असल्याचे दानवे म्हणाले. दरम्यान आयसीटी प्रमाणेच ड्रायपोर्टमुळे उद्योगाला चालना मिळणार आहे. या दोन महत्वाच्या बाबींसह जालन्यातील सिमेंटचे रत्स्यांसाठी १०० कोटी रुपये मिळणार आहेत, असेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेस भाजपचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, माजी. आ. अॅड. विलास खरात, भास्कर दानवे, किशोर अग्रवाल, अर्जुन गेही, आशिष मंत्री, मनोज पांगारकर, अशोक पांगारकर आदींची उपस्थिती होती.आयसीटी ही संस्था स्वातंत्र्यपूर्व काळातील असून, १९३३ मध्ये मुंबईत सुरू करण्यात आली होती. या संस्थेने बदलत्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून तसे अभ्यासक्रम तयार केले. त्यामुळेच या संस्थेला देशात अत्यंत प्रतिष्ठेचे स्थान आहे. आता पर्यंत या संस्थेने देशातील आघाडीचे ५०० उद्योजक निर्माण केल्याची माहिती कुलगुरू डॉ.जी. डी. यादव यांनी दिली.४जालन्यात जूनपासून अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. पाच वर्षाची पदवी तसेच पदव्युत्तर आणि नंतर डॉक्टरेटसाठी येथे संशोधन आणि प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये पाच वर्षाच्या अभ्यासक्रमात दोन वर्ष विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योगात काम करावे लागणार असल्याने कामाचा अनुभव मिळून विद्यार्थ्यांत परिपक्वता येईल.पीएचडी करणाऱ्यांना येथील उद्योजकांकडून संशोधनासाठी विद्यावेतनही देण्यात येणार आहे. या संस्थेच्या माध्यमातून मराठवाड्यात जास्तीत जास्त उद्योजक घडविण्याचे आमचे उदिष्ट असल्याचे कुलगुरू यादव यांनी स्पष्ट केले.
आयसीटीमुळे उद्योगांना चालना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 1:04 AM