मुंबई - राज्यातील मराठाआरक्षणाचा मुद्दा अधिक तापला असून यावरुन मोठं राजकारण होत असल्याचं दिसून येत आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिल्यानंतरही मनोज जरांगे आंदोलनावर ठाम आहेत. त्यानुसार, त्यांनी ३ मार्चपासून रास्तारोको आंदोलनाची घोषणा केली आहे. तर, जरांगे यांच्यावर गंभीर आरोप करत अजय बारसकर यांनी जरांगेंच्या विरोधात भूमिका घेतली. त्यावर जरांगे यांनी प्रत्युत्तरही दिलं. मात्र, आज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मला संपवण्याचा कट रचण्यात येत असल्याचंही जरांगे यांनी म्हटलं.
"मला संपवण्याचं कारस्थान देवेंद्र फडणवीस यांनी रचलं आहे. त्यांच्याच माध्यमातून वेगवेगळी लोकं पुढे करून माझ्यावर वैयक्तिक आरोप केले जात आहेत. फडणवीसांना माझा बळीच हवा असेल तर मी आज त्यांच्या सागर बंगल्यावर येतो, त्यांनी मला ठार करावं. मी सागर बंगल्यावर जाऊन उपोषण करणार आहे," अशी घोषणाच जरांगे यांनी केली. यावेळी, राजकीय नेत्यांची उदाहरणे देत फडणवीस हे दमदाटी आणि धाक दाखवून पक्ष आणि नेते फोडत असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला आहे. तसेच, माझ्यावर करण्यात आलेले आरोप सर्व खोटे असून त्यांनी तक्रार दाखवा मी तुमचं ऐकेन, असेही म्हटले.
माझ्याविरुद्ध महिलेची एक जरी तक्रार सापडली तर तुम्ही म्हणेन ते ऐकेन. गेल्या ३० वर्षात कुठेही माझ्याविरुद्ध महिलेची एक तक्रार असेल तरी मी तुम्ही सांगाल ते ऐकेल, असे देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हटलं आहे. तुम्ही एखाद्याच्या वैयक्तिक जीवनात लक्ष नाही घालून शकत, वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा नाही आणू शकत, असे म्हणत आपल्याविरुद्ध मोठा कट रचला जात असल्याचे जरांगे यांनी म्हटले. माणसं पाठवून मला बदनाम केलं जात असल्याचाही गंभीर आरोपही त्यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.
देवेंद्र फडणवीसांचं राजकारण हे जातीजातीत भांडणं लावणं आणि जातीजातीच्या नेत्यांना संपवणे असंच आहे. बहुजन, मराठा आणि ओबीसी संपला पाहिजे, हा त्यांचा डाव आहे, असे म्हणत जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केला. तसेच, मला राजकीय देणं घेणं नाही, मला फक्त मराठा समाजाला आरक्षणासाठी लढायचं आहे. माझा बळी घ्या पण सगेसोयरेची अंमलबजावणी करुनच घेणार, सागर बंगल्यावर आंदोलन करायला येणार असल्याचं जरांगे यांनी म्हटलं.