Jalna Maratha Reservation - Manoj Jarange Patil: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठाआरक्षणाबाबत आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केल्या प्रकरणी राज्यभर तीव्र असंतोष दिसून येत आहे. राज्यात ठिकठिकाणी मोर्चे, निदर्शने, निषेधाचे मोर्चे, बंद, रास्ता रोको असे विविध प्रकार घडत असल्याचे दिसून येत आहे. अशा वेळी राज्य सरकारकडून या घटनेतील जालन्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. तसेच अपर पोलिस अधीक्षक राहूल खाडे आणि डीवायएसपी यांच्या बदली करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मात्र अद्याप हे आंदोलन शमण्याचे नाव घेत नाही. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या आंदोलनकर्त्यांना भेट दिली आणि या विषयावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले. पण आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोर जरांगे हे मात्र आपल्या निर्णयावर ठाम असून आज त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे.
तर आजपासून पाणीही पिणार नाही!
मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वात सुरु असलेल्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांची डॉक्टरांनी आज तपासणी केली. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण अधिक तीव्र केलं आहे. सरकारने मागणी मान्य केल्या नाहीत तर आजपासून पाणीही घेणार नसल्याची भूमिका त्यांनी जाहीर केली.
सरकारच्या भूमिकेबाबत सकारात्मक!
"आम्ही सरकारचं ऐकतोय, सकारात्मक प्रतिसाद देतोय, डॉक्टरांचेही ऐकतोय. सरकारने आज निर्णय घेतला नाही तर पाणीही घेणार नाही. मला आता नकारात्मक बोलायचे नाही. सरकार शंभर टक्के प्रयत्न करत आहे, बैठका घेत आहेत. मी आणि माझा समाज सरकारला, डॉक्टरांना प्रतिसाद देत आहोत. शंभर टक्के निकाल लागेल. आज आम्हाला न्याय मिळणार आहे", अशी सकारात्मकताही त्यांनी बोलताना दाखवली.