लोकमत न्यूज नेटवर्कघनसावंगी : आजची ही निवडणूक ऐतिहासिक आहे. आपण जिंकलो तर राज्याचे राजकारण बदलणार आहे. यासाठी बलुतेदार व आलुतेदार आस लावून बसला आहे. ते मालक आणि आपण सालगडी असा दृष्टीकोन तयार करून घेतलेल्या सत्ताधाऱ्यांना सत्तेतून खाली खेचा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले.घनसावंगी येथे वंचित बहुजन आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ सोमवारी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी विष्णू दळवी, विष्णू शेळके, दीपक बोराडे, अॅड. प्रकाश खरात, राजेंद्र मगरे, शिवाजी सवणे, दीपक डोके यांची प्रमुख उपस्थिती होती. आंबेडकर म्हणाले, जनता हुशार झाली आहे. सर्व उपेक्षित समाज वंचिताच्या झेंड्याखाली एक झाला आहे. संघटन झाले आहे. या देशात एका भाकरीवर जगणाऱ्यांच्या हातात सत्ता का येत नाही, असा सवाल उपस्थित करीत गोदामात अन्न सडते मात्र, ते गरिबाला वाटत नाहीत. गरीब गरीबच राहिला पाहिजे, ही मानसिकता काँग्रेस-राष्ट्रवादीची होती व आता भाजप-सेनेची तीच मानसिकता आहे. यामुळे देशात कुपोषण वाढले आहे.कोल्हापूर व सांगलीत पूरग्रस्तांना सत्ताधाºयांनी मदत न करता हेलिकॉप्टरने पिकनिक केली. सेल्फी घेण्यात ते दंग होते. आम्ही त्या ठिकाणी गेल्यावर सरकार जागे झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात २०० पेक्षा अधिक जागा येणार. ते काय ज्योतिषी आहेत काय, असा सवाल उपस्थित करीत सत्ताधा-यांसह काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसवरही आंबेडकर यांनी जोरदार टीका केली.प्रचाराला आता केवळ पाच दिवसच उरले आहेत, कार्यकर्ते, पदाधिका-यांनी जिवाचे रान करून वंचित आघाडीची ध्येय-धोरणे लोकांपर्यंत न्यावीत. ही निवडणूक म्हणजे आपल्यासाठी असलेली मोठी संधी असून, जास्तीत जास्त मतदारांनी आपल्याला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही जागृत ठेवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आंबेडकर यांच्या सभेस घनसावंगीसह अन्य तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची हजेरी होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ लाख रूपये देणार असल्याचे सांगितले. मात्र, कोणालाही १५ लाख रूपये मिळाले नाहीत.१५ लाख मिळणे सोडा, आता ते आपल्या खात्यातील रक्कमही २४ तारखेनंतर काढून घेणार असल्याची टीका आंबेडकर यांनी यावेळी केली.
सत्ता आली तर महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन दिशा- आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 1:05 AM