जालना/वडीगोद्री : आरक्षणासाठी सातत्याने लढावे लागणार आहे. सरकार पलटले, तर आपल्यासमोर तीन पर्याय राहणार आहेत. आपण पुन्हा मुंबईला जाऊ. त्यावेळी तुम्ही म्हणाल तेव्हाच मी बाहेर येणार. दुसरा पर्याय त्यांचा पूर्ण टांगा विधानसभेत उलटवायचा आणि तिसरा पर्याय २८८ जागा लढायच्या का पाडायच्या याचा निर्णय १३ तारखेनंतर घेऊ, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला दिला. गावखेड्यातील मराठा-ओबीसी घडी विस्कटू देऊ नका, असे आवाहनही त्यांनी समाज बांधवांना केले.
छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर जरांगे-पाटील यांनी मंगळवारी दुपारी अंतरवाली सराटी गावातील उपोषणस्थळी जाऊन समाज बांधवांशी संवाद साधला. आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे. अखेरच्या श्वासापर्यंत मी समाजासोबत आहे. आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही. आपल्या विराेधात कितीही जातीभेद केला, तरी आपण जातीवाद करायचा नाही. अंतरवाली सराटी आणि आजू-बाजूचे गाववालेही आपले आहेत, त्यांनाही दुखवायचे नाही. दंगली घडविण्याचे छगन भुजबळ यांचे स्वप्न मराठ्यांनी पूर्ण होऊ द्यायचे नाही. ओबीसीला आरक्षण १९६७ ला मिळाले. उर्वरितांना १९९० ला मिळाले. परंतु, आम्हा मराठ्यांना १८८४ पासून म्हणजे दीडशे वर्षांपूर्वीपासून कुणबी हे ओबीसीत आरक्षण आहे. ८३ क्रमांकावर मराठा आणि कुणबी एकच आहेत. त्यामुळे २००४ चा जीआर दुरुस्त करा आणि सरसकट आरक्षण द्या. निजामकालीन गॅझेट लागू करा, सातारा संस्था, बॉम्बे गव्हर्मेंटचे गॅझेट लागू करा. सगेसोयऱ्याची व्याख्या आमच्या मागणीनुसार घ्या आणि नंतरच अंमलबजाणी करा. शासन मला, समाजाला बदनाम करण्याचा डाव टाकेल, तुम्ही सावध राहा, असे आवाहन करीत ६ ते १३ जुलै दरम्यान शांतता जागृती रॅली काढणार असल्याचेही ते म्हणाले.
जीआरमध्ये दुरुस्ती करासगेसोयऱ्याची व्याख्या आमच्या म्हणण्यानुसार घ्या आणि नंतरच अंमलबजावणी करा. हैदराबादचे गॅझेट, मुंबई गव्हर्मेंटचे गॅझेट, सातारा संस्थानचे गॅझेट लागू करा, यादीतील ८३ क्रमांकावर कुणबी व मराठा एकच आहेत, त्यामुळे २००४ च्या जीआरमध्ये दुरुस्ती करा, ही आमची मागणी आहे. आता जर तुम्ही पलटलात, तर सरकारला पलटी करू, असा इशारा देखील जरांगे यांनी दिला.
जरांगे-पाटील यांचे उत्साहात स्वागतगत १२ दिवसांपासून मनोज जरांगे-पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मोठ्या ताफ्यासह जरांगे-पाटील अंतरवाली सराटीत दाखल झाले. ग्रामस्थांनी रांगोळी काढून, औक्षण करून जरांगे-पाटील यांचे गावात स्वागत केले.