या नवीन प्रकारामुळे मुला-मुलींच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. जेवणामध्ये काय वाढले आहे यापेक्षा टी.व्ही. आणि मोबाईलवर काय सुरू आहे, यातच ते दंग असतात. अनेकांना वारंवार सूचना देऊनही मुले ऐकत नसल्याचे दिसून येते. शेवटी कसे का होईना मुले-मुली जेवण करतात, यातच पालकांना समाधान असते.
ही बाब जवळपास सर्वच कुटुंबांमध्ये समान दिसून येते. याचे परिणाम मुलांच्या पचन शक्तीवर आणि शारीरिक वाढीवरही दिसून येत आहेत. क्षमतेपेक्षा आहार जास्त घेतला जात असल्याचे दिसून येते. त्यातच जेवण झाल्यानंतरही मैदानी खेळ आता जवळपास बंद झाले आहेत. त्यामुळे पुन्हा हातामध्ये मोबाईल अथवा टी.व्ही.चा रिमोट आपोआपच येतो. हे सर्व टाळण्यासाठी पालकांना पुढाकार घेण्याची गरज आहे.
मुलांना कसल्याही पध्दतीने समजावून सांगून जेवणाच्यावेळी टी.व्ही.समोर अथवा मोबाईलसमोर ठेवून जेवण्याचे तोटे त्यांना समजावून सांगणे काळाची गरज बनली आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
पोटविकाराची प्रमुख कारणे
जेवतेवेळी मोबाईल आणि टी.व्ही समोर असल्याने अनेकजण हे त्यांच्या आहाराच्या क्षमतेपेक्षा जास्तीचे जेवण करतात. यातून मुले-मुली लठ्ठ होण्याचे प्रमाण वाढले असून, त्यांच्यातील चंचलता हिरावली जाते. शक्यतो जेवण करतेवेळी मोबाईल, टी.व्ही न लावणे हाच एक पर्याय आहे.
घरोघरी स्मार्ट फोन उपलब्ध असल्याने ही सवय मुला-मुलींना गेल्या पाच ते दहा वर्षांमध्ये जडली आहे. त्याचे विपरित परिणाम मुलांच्या एकूणच वाढीवर दिसून येतात. या हट्टामुळे कधी कधी मुलांसोबत अनेक ठिकाणी वाद होण्याचे प्रकारही घडत आहेत.
मुले जेवत नाहीत म्हणून टीव्ही
कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून जवळपास शाळा बंद आहेत. त्यामुळे मुलेदेखील घरातच राहत आहेत. याचा परिणाम मुलांच्या भूक लागण्यावर होत आहे. अनेकजण वारंवार आग्रह करूनही जेवण करत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे पालक नाईलाजाने मोबाईल मुलांना देतात.
शीतल माेहिते, जालना
लहान मुलांना गेल्या वीस ते पंचवीस वर्षांत टी. व्ही. आणि मोबाईल हा अत्यंत सहजपणे उपलब्ध होतो. यातून त्यांनाही वेगवेगळे कार्टून्स तसेच मालिकांची आवड निर्माण होते. जेवणावेळी विशेष करून या मालिका पाहण्यावर मुले भर देत असल्याने अडचण होत आहे.
प्रियंका भुमरे, जालना
जवळपास प्रत्येक कुटुंबातच पती-पत्नी हे नोकरी किंवा व्यवसाय करतात. त्यामुळे घरामध्ये आजी-आजोबा असतात. आजी-आजोबांनी अनेकवेळा आग्रह करूनही मुले-मुली टीव्हीसमोरून हटत नाहीत. हे वास्तव असून, मोबाईलचीदेखील अशीच अवस्था झाली आहे.
अश्विनी पाटील, जालना
अनेक घरांमध्ये पूर्वी सर्व परिवार हा एकत्रितपणे किमान सायंकाळचे जेवण करत असत. आता धावत्या व्यापामुळे परिवारातील सर्व सदस्य क्वचितच एकत्रित येतात. त्यामुळे मुलांनादेखील जेवणाच्यावेळी टी.व्ही. लावण्याची सवय जडली आहे. ती दूर करणे मोठे आव्हान आहे.
डॉ. एस. के. मोरे, होमिओपॅथी तज्ज्ञ
कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन होते. या लॉकडाऊनच्या काळात मुलांना मैदान, शाळांमध्ये जो व्यायाम होत होता, तो व्यायाम बंद झाला. त्याचा परिणाम मुलांची भूक मंदावणाऱ्यावर हाेतो. यामुळे कुठल्याही स्थितीत मुलांनी टी. व्ही. अथवा मोबाईल पाहू नये.
डॉ. सादत अली खान, जालना
टी. व्ही. आणि मोबाईल या वस्तू मनोरंजन आणि संपर्काचे साधन म्हणून ओळखल्या जातात. परंतु, सहज उपलब्ध होणारे इंटरनेट आणि मोबाईल यामुळे मुलांना आपोआपच त्यातून सहज वेगवेगळी कार्टून्स आणि मनोरंजनाचे कार्यक्रम उपलब्ध होतात. हे टाळल्यास आरोग्य चांगले राहील.
डॉ. संजय राख, सर्जन