लोकमत न्यूज नेटवर्क, अंतरवाली सराटी (जि. जालना) : मराठा आरक्षणासाठी अन्न-पाणी त्याग करून आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती रविवारी आणखी खालावली आहे. परंतु, जरांगे-पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिला. ‘मला बोलता येते तोपर्यंत तुम्ही चर्चेला या, आरक्षण द्यायचे की नाही ते सांगा,’ असा सवाल जरांगे-पाटील यांनी सरकारला केला आहे. दरम्यान, आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठिकठिकाणी साखळी उपोषण सुरू करण्यात आले असून, काही ठिकाणी एसटीवर दगडफेक करण्यात आली. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांंनी राजीनामा दिला असून, अनेक नेत्यांना आंदोलकांच्या रोषाला सामेरे जावे लागत आहे.
मराठा बांधवांनी एकजूट व्हावे. फूट पडू देऊ नये. महाराष्ट्रात जिथे जिथे साखळी उपोषण आहे, तिथे आमरण उपोषणाला सुरुवात करावी. प्रत्येक पोलिस ठाण्यात परवानगीचा अर्ज द्यावा. उग्र आंदोलन करू नका, आत्महत्या करू नका, असे आवाहनही मनोज जरांगे-पाटील यांनी केले. सरकारकडून अद्याप संवाद साधण्यात आला नाही. प्रश्नांची उत्तरेही मिळाली नाहीत. आम्ही त्यांच्याकडून उत्तर घेऊ. मला बोलायला त्रास होतोय. मी जास्त बोलू शकत नाही.
शिवरायांच्या पायाला स्पर्श केल्यानंतर मला आंदोलनाची ऊर्जा मिळते, असे सांगत मनाेज जरांगे-पाटील यांनी वैद्यकीय पथकाकडून उपचार घेण्यास नकार दिला.
राज्यभरात कुठे काय घडले?
- रविवारी मराठवाड्यात चार जणांनी आत्महत्या केल्या
- जालना-बीड मार्गावर तहसीलदारांच्या गाडीवर दगडफेक
- हिंगोलीत गाड्यांवरील नेत्यांच्या फोटोंना काळे फासले
- पूर्णा शहरात मंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
- धाराशीव येथे आंदोलकांनी स्वत:ला अर्धे गाडून घेतले
- साताऱ्यात शशिकांत शिंदे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार
- अहमदनगरमध्ये मंत्री केसरकर यांचा फ्लेक्स फाडला
- बंदी घातल्याने अनेक नेत्यांनी आपले दौरेच रद्द केले
विरोधक राज्यपालांच्या भेटीला
आरक्षणप्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्यांनी रविवारी राजभवनवर जाऊन राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड हे यावेळी उपस्थित होते. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळासह सोमवारी आम्ही पुन्हा या विषयावर राज्यपालांची भेट घेणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
खा. हेमंत पाटील यांचा राजीनामा
हिंगोलीचे खा. हेमंत पाटील यांना आंदोलकांनी घेराव घालून राजीनाम्याची मागणी केली. त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे राजीनामा पाठविला. दिल्ली येथे उपोषण करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
मुख्यमंत्री आज जालन्यात?
- मनोज जरांगे-पाटील यांनी प्रकृती खालवत असल्याने त्यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी जालनाला जाण्याची शक्यता आहे.
- सोमवारी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आरक्षणाबाबत ठोस दिशा ठरली तरच मुख्यमंत्री जालन्याला जाऊ शकतात.
मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवावा
मराठा आरक्षणासंदर्भात योग्य निर्णय घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. समाजाने मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवावा. जरांगे पाटील यांच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. डॉक्टरांची टीम त्यांच्यासोबत आहे. शेवटी जीव अत्यंत महत्त्वाचा आहे. मुख्यमंत्री स्वतः जातीने याकडे लक्ष देत आहेत.-देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
सरकारने हे प्रकरण लांबविल्याने आज राज्यात वणवा पेटेल की काय, अशी स्थिती आहे. जरांगे पाटील यांच्या मागणीला आमच्या पक्षाचा पाठिंबा असून त्यांच्या मागणीची पूर्तता केली पाहिजे. ती करत असताना दुसऱ्याच्या ताटातून काही काढून घ्यायचे नाही.- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी
साहित्यिकांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- कुणबी मराठा एकच जात असल्यामुळे त्या आरक्षणाचा लाभ मराठा जातीला मिळाला पाहिजे, ही जरांगे-पाटलांची मागणी अगदी रास्त आहे.
- ती मागणी महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर मान्य करावी, अशा आशयाचे
- पत्र साहित्यिक मंडळींनी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.
- या पत्रावर ज्येष्ठ विचारवंत तथा महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्यासह राज्यातील महत्त्वाच्या साहित्यिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.