लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : मनुष्य जीवनात सुख शांती हवी असेल तर अहंकार व मायेचा त्याग केल्याशिवाय परमेश्वर प्राप्ती होणार नाही. यासाठी नामस्मरण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन स्वामी हरीचैतन्यानंद महाराज यांनी केले. त्यांच्या मधुर वाणीतून जाफराबाद येथील आदर्शनगर येथे संगीतमय भागवत कथेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी परिसरातील श्रोत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.तिसरे पुष्प गुंफताना प. पु. स्वामींनी उपदेश देताना सांगितले की, नरदेह दुर्लभ आहे. तेव्हा या नरदेहाचे कल्याण करायचे तर मानवाने गुरुभक्ती केली पाहिजे, कारण त्याद्वारे परमेश्वर प्राप्ती होते. माया, मोह, अहंकार हे परमेश्वर प्राप्तीसाठी फार मोठे अडथळे आहेत. तेव्हा त्यांचा त्याग केला पाहिजे, असे सांगत चांगले कार्य करा यश निश्चित मिळते असे ही ते म्हणाले. कथा श्रवण करण्यासाठी पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. शेवटी श्रीमद् भागवत कथेच्या आरतीद्वारे कथेची सांगता झाली.याप्रसंगी परिसरातील भाविक - भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.तीन दिवसांपासून भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. या संगीतमय भागवत कथेमध्ये स्वामीजींनी प्रियावर्त, भरत, अजामेळ, परीक्षित प्रल्हाद हिरण्यकश्यपू यांच्या विविध कथांमधून समाजास सत्संग, गुरूभक्ती, गुरुसेवा, गुरुश्रद्धा या गुणांची आस धरावी तर माया, मोह, अहंकार या दुर्गुणांचा त्याग करावा असा उपदेश त्यांनी यावेळी केला.
अहंकार, मायेचा त्याग केल्यास परमेश्वर प्राप्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 12:22 AM