- दीपक ढोलेजालना : अवैध गर्भपात प्रकरणात फरार असलेल्या संदीप गोरे याला मदत करणाऱ्या एकास पोलिसांनी जेरबंद केले आहे. तो सतीश गवारेचा मेव्हणा असल्याचेही पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान, बीड पोलिसांनी जप्त केलेली सोनोग्राफी मशीन ही गवारेचीच असल्याची कबुली शिकाऊ डाॅक्टर सतीश सोनवणे याने पोलिसांना दिली आहे. त्यामुळे हीच मशीन जालन्यातही गर्भपातासाठी वापरल्याचा संशय पोलिसांना आहे.
अवैध गर्भपात प्रकरणात अटकेत असलेला डॉ. सतीश गवारे याचा शिष्य सतीश सोनवणे याला जालना पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी बीड कारागृहातून ताब्यात घेतले आहे. त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलीस कसून चौकशी करीत आहेत. चौकशी दरम्यान, त्याने बीड पोलिसांनी जप्त केलेली मशीन ही गवारेचीच असल्याचे सांगितले आहे. परंतु ती जालन्यात वापरण्यात आली की नाही, याबाबत माहीत नसल्याचे सांगितले. सोमवारपर्यंत तो पोलीस कोठडीत असून, त्याची पोलीस कसून चौकशी करणार असल्याचे सांगण्यात आले.
दुसरीकडे फरार असलेला संदीप गोरे याला पकडण्यासाठी पोलिसांचे एक पथक गेले होते. परंतु त्याला पोलिसांचा सुगावा लागताच त्याने तेथून पळ काढला. मात्र, पोलिसांनी त्याला मदत करणाऱ्या एका इसमास अटक केली आहे. तो सतीश गवारेचा मेव्हणा असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. अटक केलेला इसम हा संदीप गोरेला पैशाची मदत करीत होता. शिवाय, त्याला मोबाइलही घेऊन देत होता, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
किती गर्भपात केले हे कधी कळणार ?डॉ. सतीश गवारे व त्याच्या साथीदाराने जालन्यासह बीडमध्ये किती गर्भपात केले याची माहिती अद्यापही पोलिसांना मिळाली नाही. शिवाय, चार आरोपीही अद्याप फरार आहेत. त्यामुळे किती गर्भपात झाले, किती महिलांची तपासणी केली आदी प्रश्नांची उत्तरे मिळण्यास उशीर लागण्याची शक्यता आहे.