जालना : डोक्यावर झालेला कर्जाचा बोजा काढण्यासाठी रस्त्याच्या बांधकामाच्या ठिकाणाहून जेसीबी चोरी करणाऱ्या चौघांना सदर बाजार पोलिसांनी अवघ्या १२ तासांत ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून जेसीबीसह दोन कार, असा ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई सदर बाजार पोलिसांनी मंगळवारी केली आहे. शेख मोहम्मद शेख बशीर (३०, रा. एकलारा, ता. चिखली), सागर हरिश्चंद्र वांजोळ (रा. बोरगाव काकडे, ता. चिखली), दीपक मुरलीधर मांजरे (२३, रा. एकलारा, ता. चिखली), नारायण अशोक दळवी (२४, रा. एकलारा, ता. चिखली) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. कन्हैयानगर भागात सुरू असलेल्या रस्त्याच्या बांधकामाच्या ठिकाणाहून जेसीबी २६ फेब्रुवारी रोजी चोरी गेली होती.
याप्रकरणी संदीप किसनराव नाईकवाडे (रा. गोपीकिशननगर, जालना) यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असताना, पोलिसांनी सीसीटीव्हीची पाहणी केली. ज्या रोडने जेसीबी गेली, त्या रोडचे सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले. पोलिसांनी जेसीबीची चिखलीच्या दिशेने गेल्याचे दिसले. तपास करीत असतांना पोलिसांनी शेख मोहम्मद शेख बशीर याला ताब्यात घेतले. त्याला विचारपूस केली असता, त्याने संशयित सागर वांजोळ, दीपक मांजरे, नारायण दळवी यांच्यासोबत केल्याचे सांगितले.
त्यानंतर पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्यांनी कर्ज फेडण्यासाठी सदरील गुन्हा केल्याचे सांगितले. त्याच्याकडून जेसीबी व चोरी करण्यासाठी फोर्ड इकोस्पोर्ट, मारुती अल्टो कार, असा एकूण ४६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोनि सुनील अंबुलकर, पोनि रामेश्वर खनाळ, उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, सुभाष पवार, धनाजी कावळे, इरशाद पटेल, सोमनाथ उबाळे, मनोहर भुतेकर, सागर बाविस्कर यांनी केली आहे.