लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : सुखापुरी फाट्याच्या शिवारातील गोदावरी नदीपात्रातून अवैधरीत्या वाळूचा उपसा करणा-या हायवावर अंबड येथील उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांच्या पथकाने कारवाई केली. हदगल यांनी तीन दिवसांत चार वाहने पकडून दंडात्मक कारवाई केली आहे.हदगल यांनी मध्यंतरी वाळू माफियांच्या विरोधात धडक मोहीम हाती घेतली होती. कार्यालय, घरापासून ते रस्त्यापर्यंत वाळू माफियांचे जागोजागी लोकशेन माणसे तैनात असूनही उपविभागीय अधिकारी हदगल यांनी लोकेशन बहाद्दरांना चकवा देत गोदावरी नदीच्या पात्रातील अवैध वाळू उपसा व हायवाविरुध्द धडक कारवाई केल्याने नदीपात्रात सन्नाटा पसरला होता.परंतु, विधानसभा निवडणूक कार्यक्रम लागला आणि हदगल यांना निवडणुकीचे काम लागले. त्यामुळे पुन्हा वाळू माफियांनी गोदापात्रात बस्तान मांडून रात्रंदिवस अवैध वाळू उपसा सुरू केला होता. मात्र, उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांनी आता पुन्हा कारवाईचे सत्र सुरू केले आहे.हदगल यांनी दिनांक ५ नोव्हेंबर व ६ नोव्हेंबर रोजी अनुक्रमे हायवा (९४४०) व दुसरा हायवा ( एम.एच.२० डी.ई. २७९०) अशा दोन वाहनांवर कारवाई केली. तसेच गुरूवारी सुखापुरी फाट्यावर ६३२२ क्रमांकाचे दोन हायवा पकडले आहेत. या वाहनांवर अंबडचे तहसीलदार दंडात्मक कारवाई करणार आहेत.दरम्यान, हदगल यांनी कारवाईचे धडक सत्र पुन्हा सुरू केल्याने अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. हदगल यांनी आपल्या सहकारी अधिकारी, कर्मचा-यांनाही अवैध वाळू उपशाबाबत सूचना दिल्या असून, अशाच कारवाई सुरू राहणार आहेत.
गोदापात्रातून अवैध वाळू उपसा; उपविभागीय अधिकाऱ्यांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2019 12:47 AM