लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यातील पूर्णा, केळना नदीच्या पात्रातून अवैधरीत्या वाळू उत्खनन, वाहतूक करणाºया सहा वाहनांसह एक जेसीबी भोकरदन पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई रविवारी सायंकाळी तडेगाव, खापरखेडा, मासनपूर गावच्या शिवारात करण्यात आली.तालुक्यातील अवैध धंद्यांबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांकडे तक्रारी वाढल्या होत्या. पोलीस अधीक्षक एस़ चैतन्य यांनी दोन दिवसांपूर्वी भोकरदन तालुक्यातील भोकरदन, हसनाबाद, पारध पोलिस ठाण्यांना भेटी देऊन कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. तसेच अवैध वाळू वाहतुकीसह इतर अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष केल्यास कारवाईचा इशारा दिला होता. त्यानुसार पोलीस प्रशासनाने कारवाई मोहीम हाती घेतली आहे.तालुक्यातील खापरखेडा, तडेगाव, मासनपूर आदी गावच्या शिवारातील नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन, वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये, पोनि दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी मिलींद सुरडकर, रूस्तुम जैवळ, जगन्नाथ जाधव, समाधान जगताप, गणेश निकम, संजय क्षीरसागर यांनी रविवारी रात्री नदीच्या पात्रात अचानक छापे टाकले. यावेळी एक हायवा (क्र.एम.एच. २१- बी.एच. २४९८) पकडण्यात आला. चालक योगेश संजय बरडे (रा फत्तेपूर) व मालक गणेश माधवराव टेपले (रा. चांदई टेपली) यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथे वाळू भरून देणारी जेसीबी आढळून आली आहे. जेसीबीचा मालक विशाल दलसिंग घुसिंगे (रा. तडेगाववाडी) व चालक काकासाहेब साबळे (रा. बरंजळा साबळे) विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच ठिकाणी वाळू खाली करून पळून जाणा-या दोन ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली. चालक भरत भगवान सुलाने (रा. नळणी वाडी), दादाराव विठ्ठल सुलाने (रा. नळणी वाडी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रविवारी रात्री मासनपूर शिवारातील केळना नदीच्या पात्रातून अनिल त्र्यंबक बरडे (रा़ फत्तेपूर), मनोहर उत्तमराव पाचरकर (रा. तडेगाव) यांच्या ताब्यातील दोन ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले. या दोघांविरुद्ध भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी जवखेडा ठोंबरी शिवारातील पूर्णा नदीच्या पात्रातून रवींद्र अशोक ठोंबरे यांचे ट्रॅक्टर (क्र. एम.एच. २१- बी.एफ. ३८९३) ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अवैध वाळू उत्खनन, वाहतूक करणाऱ्यांविरूध्द धडक कारवाई सुरू केल्याने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे.
नदीपात्रातून अवैध वाळू उपसा, वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 12:51 AM