प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या परिसरात घनवन प्रकल्प राबवणार
जालना : सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी शासनामार्फत अनेक योजना राबविण्यात येतात. योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधीही उपलब्ध करून देण्यात येतो. या योजनांचा लाभ जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी योजनांची गतीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले.
जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांच्या कार्यालय प्रमुखांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी शर्मिला भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना जिल्हाधिकारी बिनवडे म्हणाले की, शासनाच्या योजना राबवत असताना प्रत्येक शासकीय विभागांचा एकमेकांशी संबंध येत असतो. योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी अनेक वेळा वेगवेगळ्या विभागांच्या परवानग्या, नाहरकत प्रमाणपत्र आदींची आवश्यकता असते. त्यामुळे शासनाच्या योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबवून त्याचा लाभ सर्वसामान्यांना होण्यासाठी प्रत्येक विभागाने एकमेकामध्ये समन्वय साधून काम करण्याची गरज आहे. योजना राबविण्यामध्ये काही अडचणी असतील तर त्या जिल्हा प्रशासनाला कळवाव्यात. योजना राबविण्यामध्ये असलेल्या अडचणी जिल्हा, विभाग तसेच राज्यस्तरावर पाठपुरावा करून दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्याचबरोबर यापुढे प्रत्येक विभागाचा योजनानिहाय आढावा घेण्यात येऊन योजनांच्या प्रगतीबाबतची माहिती घेण्याबरोबरच योजना राबविताना येणाऱ्या अडचणींची सोडवणूक करण्यात येणार असल्याचेही बिनवडे यांनी सांगितले. प्रत्येक जिल्ह्यामध्ये वृक्ष लागवड करून वृक्षांचे प्रमाण वाढविण्यात येत आहे. त्यानुसार जालना जिल्ह्यातही वृक्ष लागवडीवर भर देण्यात यावा. प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या परिसरामध्ये घनवन वृक्ष लागवड प्रकल्प राबविण्याच्या विभागीय आयुक्तांनी सूचना दिलेल्या असून, त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या परिसरामध्ये घनवन प्रकल्प राबविण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या. यावेळी सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
गौण खणिजांची वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा
सद्यस्थितीमध्ये ऊस कारखाने सुरू झालेले आहेत. उसाची मोठ्या प्रमाणात वाहतूक करण्यात येत आहे. ऊसाची बैलगाडी अथवा ट्रॅक्टर, ट्रॉलीमधून वाहतूक होत आहे; परंतु या ट्रॉलीला रिफ्लेक्टर नसल्याने अनेक वेळा अपघात घडतात. त्यामुळे उसाची वाहतूक करणाऱ्या प्रत्येक ट्रॉलीला रिफ्लेक्टर असतील याची काळजी घेण्याबरोबरच जालना जिल्ह्यामध्ये जे अपघात स्थळे आहेत, अशा ठिकाणी बोर्ड, रम्बलर यासारख्या उपाययोजना करण्यात याव्या. अवैधरीत्या गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.