राजूर ( जालना) : भोकरदन तालुक्यातील चांधई एक्को येथे आठ दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता, याच काळात गावात नवीन वेशीचे बांधकाम करण्यात येऊन तेथे स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाचे बॅनर लावले होते. यावरून गुरुवारी सकाळी वाद उफाळला होता. संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यासह हवेत गोळीबार केला होता. दगडफेकप्रकरणी शुक्रवारी पोलिसांनी २५० जणांवर गुन्हे दाखल केले. ३७ जणांना ताब्यात घेतले असून, यात तीन महिलांचा समावेश आहे.
चांधई एक्को येथे शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गावात बसविला होता. हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. लगेचच गावाच्या प्रवेशद्वारावर नवीन वेशीचे बांधकाम करून तेथे भाजपचे ज्येष्ठ नेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाचे बॅनर लावले होते. त्यावरून दोन गटात कुरबुर सुरू होती. या कुरबुरीचे गुरुवारी वादात रूपांतर झाले. दोन्ही बाजूने मोठा जमाव एकत्रित येत त्यांच्यात तुफान दगडफेक झाली. यावेळी सकाळपासूनच मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वारंवार आवाहन करूनही जमाव शांत होत नसल्याचे चित्र होते. संतप्त जमावातील काहींनी पोलिसांच्या दिशेनेही दगड भिरकावल्याने अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख हे किरकोळ जखमी झाले होते. जमावाला शांत करण्यासाठी अश्रुधुराच्या १६ नळकांड्या फोडण्यात आल्या, तरीही जमाव शांत न झाल्याने पोलिसांनी हवेत गोळीबार केल्यावर जमाव पांगला.
याप्रकरणी जातीय घोषणाबाजी करून जातीय तेढ निर्माण करणे, अतिक्रमण केलेली जागा प्रशासन मोकळी करीत असताना कट रचून गैरकायद्याची मंडळी जमवून जीवे मारण्याच्या धमक्या देणे आदी कारणांवरून जवळपास २५० जणांवर हसनाबाद पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रामदास विठोबा तळेकर, जगन पवार, नाना ढाकणे, विष्णू मोरे, रामदास ज्ञानदेव तळेकर, विलास तळेकर, भगवान ढाकणे, अण्णा ढाकणे, भास्कर ढाकणे, राहुल तळेकर, सुरेश दानवे, राजू बकरे, दत्ता तळेकर, भाऊसाहेब गाडेकर, अमोल तळेकर अशी संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी ३७ जणांना ताब्यात घेतले असून, यात तीन महिलांचा समावेश आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी इंदलसिंह बहुरे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष घोडके हे करीत आहेत.