जालना : तीर्थपुरी येथे पेटविलेली बस, मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली आक्रमक भूमिका या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळीच राज्य परिवहन महामंडळाकडून विविध मार्गावरील बसेस बंद करण्यात आल्या आहेत. शिवाय १२ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून, जिल्ह्यातील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.
मुंबईच्या दिशेने निघालेले मनोज जरांगे पाटील हे सोमवारी सकाळी भांबेरी येथून अंतरवाली सराटी येथील उपोषणस्थळी दाखल झाले आहेत. इथे कोणी थांबू नका. शांतता ठेवा, पोलिसांना सहकार्य करा, शांततेत आंदोलन करा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.
जरांगे यांनी घेतलेल्या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीत गर्दी होवू नये यासाठी अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यात १२ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. तीर्थपुरी येथे बस पेटविल्यानंतर पोलिसांच्या सूचनेनुसार विविध मार्गावरील बससेवा बंद करण्यात आल्या आहेत. अंतरवाली सराटी येथील उपोषणाबाबत आणि जिल्ह्यात घडणाऱ्या घटनांबाबत सोशल मीडियावर चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. प्रारंभी मोबाईल इंटरनेट बंद झाले असून, लॅण्डलाईन सेवाही बंद होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.