जालना : महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या गोटातून मान-सन्मानावरून नाराजीचा सूर उमटत आहे. त्यात वरिष्ठ स्तरावर काही जागांवर एकमत होत नसल्याने शिवसेनेची यादीही जाहीर होत नाहीत. त्यामुळे नेत्यांमध्येही खदखद आहे. या पार्श्वभूमीवरच शिवसेनेचे उपनेते, माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी भाजपच्या भूमिकेवर टीका केली. याचवेळी त्यांनी भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या वागणुकीवरच थेट नाराजी व्यक्त केली आहे.
जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांची मोट बांधली जावी, यासाठी काही दिवसांपूर्वी एकत्रित मेळावा घेण्यात आला. त्यानंतर मात्र विविध कार्यक्रमांत भाजपकडून मानसन्मान मिळत नसल्याची खंत शिवसैनिकांनी खोतकर यांच्याकडे व्यक्त केली होती. शिवसैनिकांना मान मिळत नसेल तर आपणही कार्यक्रमास जाणार नाही, अशी भूमिका घेत ‘नाराजी योग्य ठिकाणी व्यक्त केल्याचे’ संकेत खोतकरांनी दिले होते. परंतु, तद्नंतरही शिवसेना, भाजप कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाले नसल्याचे दिसून येते. एकीकडे जिल्ह्यात भाजप- सेना कार्यकर्त्यांचे मनोमिलन दिसत नसताना दुसरीकडे राज्यात काही जागांचा तिढा आहे. शिवसेनेच्या जागांवर भाजपाकडून केल्या जाणाऱ्या दाव्यांवर खोतकरांनी नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यात शिवसैनिकांना सन्मान मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. तरी आम्ही आमच्या बाजूने शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतो. परंतु, त्यांच्या बोलण्या, वागण्यात बदल होत नाही, असे म्हणत दानवे यांच्याकडे बोट केले. असे असले तरी आम्ही शंभर टक्के महायुतीचे काम करणार असल्याचेही खोतकर यांनी सांगितले.
मागील लोकसभा निवडणुकीत होता तणाव यंदा तर महायुती...मागील लोकसभा निवडणुकीत अर्जुन खोतकर यांनी भाजपचे रावसाहेब दानवे यांच्या विरोधात निवडणुकीत उतरण्याची तयारी केली होती. खोतकर यांनी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपासून शिवसेनेच्या नेत्यांनाही प्रयत्न करावे लागले होते. वरिष्ठांनी मनधरणी केल्यानंतर खोतकर यांनी माघार घेतली होती. यंदाच्या निवडणुकीत महायुती असताना सन्मान मिळत नसल्याने शिवसैनिक नाराज आहेत. त्यामुळे शिवसैनिकांची नाराजी भाजप कशी दूर करणार ? याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.
शिवसैनिकांनी फिरविली कार्यक्रमांकडे पाठभाजपकडून सन्मान मिळत नसल्याची तक्रार करीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही भाजपकडून होणाऱ्या कार्यक्रमांकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. भाजपकडून निवडणुकीची तयारी सुरू असली तरी शिवसेनेच्या गोटात मात्र नाराजीचा सूर असल्याने लोकसभा निवडणुकीबाबत शांतताच दिसत आहे.