- संजय देशमुखजालना : राज्यातील सत्तांतरानंतर मंत्रिपदाचे वेध भाजपच्या तिन्ही आमदारांना लागले आहेत. असे असले तरी आमदार संतोष दानवे यांचे वडील रावसाहेब दानवे हे केंद्रात रेल्वे राज्यमंत्री असल्याने एकाच घरात दोन मंत्रिपदे जाणार नाहीत. त्यामुळे खरी स्पर्धा आहे, ती परतूरचे आमदार बबनराव लोणीकर आणि बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांच्यात.
बबनराव लोणीकर यांना मंत्रिपदाचा पाच वर्षांचा अनुभव हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील आहे. लोणीकरांकडे पाणीपुरवठा हे महत्त्वाचे खाते होते. त्या खात्यात त्यांनी अभ्यास करून राज्यासाठी वॉटरग्रीड योजना अर्थात धरणे एकमेकांना जोडून पाणी व्यवस्थापन करणे ही होती. त्याचा श्रीगणेशा आणि पायलट प्रोजेक्ट म्हणून जालना जिल्ह्यात ही योजना १७२ गावांसाठी राबविण्यात आली होती; परंतु राज्यातील महाविकास आघाडीने या योजनेस छदामही दिला नाही. त्यामुळे ही योजना बंद पडली आहे.
लोणीकर हे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे समजले जातात. त्यामुळे लोणीकरांना नवीन मंत्रीमंडळात पुन्हा संधी मिळण्याची शक्यता त्यांचे समर्थक वर्तवितात. तर दुसरीकडे बदनापूर या राखीव मतदारसंघातून सलग दोनवेळेस विजयी झालेले आमदार नारायण कुचे यांना सोशल इंजिनिअरिंगचा विचार करून त्यांना राज्यमंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता भाजपच्या गोटात चर्चिली जात आहे. कुचे हे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या गटाचे मानले जातात. त्यामुळे लोणीकर आणि आमदार कुचे यांच्यातच मंत्री मंडळात वर्णी लागण्यासाठी स्पर्धा आहे.