- शिवचरण वावळे
जालना : बॅटींग करताना एका ३५ वर्षीय खेळाडूचा मैदानातच हार्टअटॅकने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जालना येथे आज, सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. विजय हरून पटेल (३५) असे मृत खेळाडूचे नाव आहे.
नाताळनिमित्ताने शहरातील आझाद मैदानावर ख्रिसमस ट्रॉफी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी ३० रोजी जिजस विरुद्ध यंगस्टार संघात क्रिकेटचा सामना सुरू होता. मुंबईच्या यंगस्टर संघाची बॅटींग सुरू होती. संघाकडून विजय पटेल यांच्यासह अन्य एक बॅटर मैदानावर होते. आपसात संवाद साधून दोघेही पीचवर आपापल्या ठिकाणी जात होते. दरम्यान, विजय पटेल काही अंतरावर जाताच थोडे थांबले. काही सेकंदात ते खेळपट्टीवर कोसळले.
हे दृश्य पाहून बॉलिंग करणाऱ्या जिजस टिमच्या एका खेळाडूंनी लागलीच विजय यांच्याकडे धाव घेतली. विजय यांना सरळ करून जमीनिवर झोपवले. तोपर्यंत दोन्ही संघातील सर्वच खेळाडूंनी विजय पटेल यांच्याकडे धाव घेतली. त्यांना मैदानातून लागलीच शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या येथे डॉक्टरांनी तपासणी त्यांना मृत घोषित केले. विजय पटेल हे मुंबई महापालिकेत कर्मचारी असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. मैदानावरच त्यांचा हार्टअटॅकने मृत्यू झाल्याने खेळ जगतात हळहळ व्यक्त होत आहे.
एक महिन्यापूर्वीच क्रिकेटपटू इम्रान पटेलचाही मैदानात मृत्यूछत्रपती संभाजीनगर येथील गरवारे क्रिकेट स्टेडियमवर २७ नोव्हेंबर रोजी एका सामन्यादरम्यान प्रतिभावान अष्टपैलू खेळाडू इम्रान पटेल (वय ४०) मैदानातच कोसळला होता. त्याला तात्काळ खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता महिन्याभरातच तरुण खेळाडूचा मैदानावर मृत्यू झाला झाल्याने क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे.