जालना : वारंवार फोन करून बँक खात्याची माहिती घेऊन १ लाख ५० हजार रूपयांची फसवणूक करणाऱ्याकडून अवघ्या १२ तासांत सायबर पोलिसांनी संपूर्ण रक्कम फिर्यादी महिलेस परत केली आहे. पैसे मिळाल्यामुळे फिर्यादीने पोलिसांचे आभार मानले आहे.
जालना शहरातील प्रीतीसुधानगर येथील रहिवासी संध्या अनिल बाफना या १ जुलै रोजी घरी होत्या. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एका व्यक्तीने वारंवार फोन करून, त्यांच्याकडून बँक खात्याची माहिती विचारून घेतली. काही वेळातच, त्यांच्या खात्यातून ५० हजार रूपये विथड्रॉल झाले. तीन वेळा त्यांचे जवळपास १ लाख ५० हजार रूपये विथड्रॉल झाले. २ जुलै रोजी याची माहिती सायबर पोलिसांना देण्यात आली. सायबर पोलिसांनी तत्काळ सायबर सेफ पोर्टल व एनसीसीआर पोर्टलची तांत्रिक मदत घेऊन संबंधित बँकेशी संपर्क केला.
नंतर एनसीसीआर पोर्टलवर ऑनलाईन तक्रार केली. नंतर ३ जुलै रोजी सदरील महिलेचे १ लाख ५० हजार रूपये त्यांच्या खात्यात परत आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. जनार्दन शेवाळे, सपोनि. सुरेश कासुळे, सफौ. पाटोळे, पोह. राठोड, पोना. मांटे, मपोना. चव्हाण, भवर, गुसिंगे, मोरे,मुरकुटे यांनी केली आहे.
कोणालाही बँक खात्याची माहिती देऊ नकाकोणत्याही अनोळखी मोबाईल क्रमांकावरून मेसेज, लिंक, फोन, क्यू आरकोड आल्यास खात्री केल्याशिवाय आपल्या बँक खात्याशी संबंधित कोणतीही माहिती व ओटीपी देऊ नका. फसवणूक झाल्यास तत्काळ १९३० या क्रमांकावर माहिती द्यावी.- जनार्दन शेवाळे, पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे