वडीगोद्री : अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शनिवारी पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद न साधता अवघ्या आठ मिनिटांत त्यांनी पाहणी दौरा आवरल्याने शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. यावेळी त्यांनी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
वडीगोद्री येथे गुरुवारी रात्री वादळी वाऱ्यासह झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यात गहू, हरभरा, ज्वारी पिकांसह मोसंबीचे अतोनात नुकसान झाले आहे. शनिवारी कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे बीड येथून भोकरदनकडे जात होते. त्यांनी अचानक अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे आपल्या वाहनांचा ताफा थांबवून नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. अंतरवाली सराटी शिवारातील गट नंबर १९७ मधील संजय कुमार तांदळे यांच्या शेतात आडवा झालेल्या गव्हाची पाहणी करून तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा कृषी अधीक्षक भीमराव रणदिवे यांना दिले.
यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक भीमराव रणदिवे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे, तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी, नायब तहसीलदार धनश्री भालचिम, गणेश गावडे, बप्पासाहेब काळे, उमेश बर्वे, सेवानिवृत्त मंडळ कृषी अधिकारी हनुमंत काळे, कैलास माने, ऋषिकेश लिपणे, पवन पवार, रवींद्र घाडगे आदींची उपस्थिती होती.