जळगाव : राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यातील निवडणूका तसेच २०२४ ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने रक्षाबंधनाची भेट म्हणून घरगुती गॅसच्या किमतीत २०० रुपयांनी कमी केल्या. मुळात ‘उज्ज्वला’ च्या नावाखाली केंद्र सरकारने आतापर्यंत ६८ हजार कोटी ७० लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम देशातील जनतेकडून वसूल केल्याचा आरोप कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी केला आहे.
कॉग्रेस नेते राहूल गांधी यांनी गेल्या वर्षी ७ सप्टेबर रोजी कन्याकुमारीपासून भारत जोडो यात्रेला सुरुवात केली होती. त्याला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजप व केंद्र सरकारच्या कामांचा पर्दाफाश करण्यासाठी गुरुवारी कॉग्रेस भवनात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी शहराध्यक्ष श्याम तायडे, प्रभाकर सोनवणे, ज्ञानेश्वर कोळी, सुधीर पाटील आदी उपस्थित होते. कॉग्रेस पक्षाच्या काळात ३५० रुपये गॅस सिलिंडरचे दर होते, भाजपने ते ११०० रुपयांपर्यंत नेले. यात ८ लाख कोटी रुपये जनतेकडून वसूल केल्याचा आरोप पवार यांनी केला.
६८ टक्के लोकांचा विरोध तरी भाजप सत्तेवरलोकसभा निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक खासदार निवडणूक आले म्हणून मोदी पंतप्रधान झाले. मतांचे गणित पाहिले तर भाजपला ३२ टक्के लोकांनी मतदान केले आहे तर ६८ टक्के लोकांनी विरोध दर्शविला आहे. तरी देखील भाजपच सत्तेवर आहे. आता मात्र येणाऱ्या निवडणुकीत भाजप सत्तेवर येणारच नाही असा दावाही त्यांनी केला. मुंबईच इंडिया आघाडीचा धसका घेऊनच त्यांनी गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्या.
कॉग्रेस सत्तेवर आल्याशिवाय चप्पल घालणार नाहीमालखेडा, ता.जामनेर येथील विकास आत्माराम राठोड या कार्यकर्त्याने देशात कॉग्रेस सत्तेवर आल्याशिवाय आपण चप्पल घालणार नाही अशी शपथ घेतली आहे. २०१९ पासून ते अनवानी फिरत आहेत. कॉग्रेसच्या जनसंवाद यात्रेत या कार्यकर्त्याची भेट झाली. त्याला थेट पत्रकार परिषदेतच आणण्यात आले होते. ३ सप्टेबर रोजी उनपदेव, ता.चोपडा येथून सुरु झालेल्या जनसंवाद यात्रेचा १२ सप्टेबर रोजी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थित सावद्यात समारोप होत आहे.