जालना : शहरातील तीन स्टील उत्पादकांसह एक खासगी फायनान्सर, सहकारी बँकेवर छापे टाकून जवळपास १९० कोटींची बेहिशेबी मालमत्ता आढळून आल्याचे आयकर विभागाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यात १२० कोटी रुपयांचा बेहिशेबी स्क्रॅप, ५६ कोटी रुपयांची रोकड आणि चौदा कोटी रुपयांचे सोने यांचा समावेश असल्याचे नमूद करण्यात आले.
जालना येथील कालिका स्टील, एसआरजे स्टील, गजकेसरी स्टीलसह फायनान्सर विमलराज सिंघवी, डीलर प्रदीप बोरा यांच्या निवासस्थानी आणि कंपन्यांसह त्यांच्या फार्म हाऊसवर आयकर विभागाने एक ते ८ ऑगस्टदरम्यान अचानक छापे टाकून ही कारवाई केली. यातील एसआरजे स्टीलच्या जुना जालना भागातील निवासस्थानी आणि कंपनीत हे छापे टाकण्यात आले. तसेच कालिका स्टीलच्या संचालकांच्या निवासस्थानी आणि फार्म हाऊसवर कारवाई करण्यात आली. तेथे मोठ्या प्रमाणावर रोकड मिळाली.
जालन्यातील विविध सहकारी तसेच राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये या तिन्ही कंपन्यांच्या मालकांनी त्यांच्या कंपनीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या नावाने ३० पेक्षा अधिक लॉकर घेऊन त्यात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम ठेवल्याचे आढळून आले. लॉकरमधील रक्कम तसेच फार्म हाऊसवरील रक्कम अशी एकूण ५६ कोटींची रोख रक्कम आढळून आली आहे. बेडखाली लपवल्या नोटा होत्या.
बनावट कंपन्यांमध्ये गुंतविले पैसे
कोलकाता येथील बनावट कंपनीचे शेअर अधिकच्या दराने खरेदी केल्याचे दाखवून तेथे गुंतवणूक केल्याचे उघड झाले. ही रक्कमही काही कोटींत असल्याचे सांगण्यात आले. यातून जीएसटीचीदेखील चोरी केल्याचे दिसून आले. परंतु याची अद्याप चौकशी झाली नसल्याचे सांगण्यात आले. जालन्याप्रमाणेच या कंपन्यांच्या औरंगाबाद, मुंबई आणि नाशिक येथील कार्यालयातही छापे टाकून चौकशी करण्यात आली. आयकर विभागाने गुरुवारी दिलेल्या निवेदनात आणखी चौकशी सुरू असल्याचे नमूद केले आहे.
रोकड मोजायला लागला दीड दिवस
आयकर विभागाने जप्त केलेली जवळपास ५६ कोटींची रक्कम मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना दीड दिवसांचा कालावधी लागला. जालन्यात या तिन्ही कंपन्यांमध्ये लोखंडी सळ्या अर्थात स्टील बार निर्मितीसाठी स्क्रॅपची गरज पडते. असे असताना या १२० कोटी रुपयांच्या स्क्रॅपच्या कुठल्याच नोंदी नसल्याचे दिसून आले.
गाड्यांवर लावले विवाहाचे स्टिकर
यासाठी जवळपास २६० अधिकारी आणि कर्मचारी हे शंभरपेक्षा अधिक गाड्यांमधून आले होते. या छाप्यांविषयी कोणालाही कुणकुण लागू नये म्हणून गाड्यांवर विवाह सोहळ्याचे स्टिकर लावण्यात आले होते.