जालना : एमआयडीसीतील उद्योजकांवर आयकर पाठोपाठ जीएसटीच्या पथकाने दोन दिवसांपासून छापेमारी सुरू केली आहे. त्यात येथील ओमसाईराम आणि अन्य एका त्यांच्याच नातेवाइकांच्या स्टील कंपनीवर हे छापे टाकण्यात आले आहेत.
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आयकर विभागाने जालन्यातील स्टील उद्योजकांवर मोठी कारवाई करून खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर पुन्हा नवीन मोंढा भागातील ड्रायफ्रूटचे घाऊक व्यापारी आणि साबणविक्रीचे डिलर यांच्यावर गेल्याच आठवड्यात छापे टाकले. ही कारवाई संपते न संपते, तोच सोमवारपासून एमआयडीसीत जीएसटीचे पथक दाखल झाले आहे.
येथील ओमसाईराम स्टीलसह अन्य एका कंपनीवर राज्य जीएसटीच्या विभागाने अचानक छापे टाकले. त्यात मोठ्या प्रमाणावर जीएसटी न भरलेले व्यवहार उघडकीस आल्याचे सूत्रांनी सांगितले; परंतु नेमका किती जीएसटीचा भरणा झाला नाही, हे आताच कळू शकत नसल्याचेही सांगण्यात आले. एकूणच ही कारवाई जरी ओमसाईराम या स्टील उद्योगावर झाली असली तरी अन्य स्टील उद्योगही रडारवर असल्याचे सूत्रांनी सांगितले. या यंत्रणांच्या कारवाईच्या सलग सत्रांनी उद्योजकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. एकीकडे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून रोजगार उपलब्ध करून देत असताना यंत्रणा जर असा ससेमिरा मागे लावून उद्योजकांवर संशय घेत असतील तर आम्ही काय करावे, असा सवाल उद्योजक खासगीत बोलून दाखवित आहेत.
या आधीही झाली होती कारवाईजीएसटीच्या नाशिक येथील विभागाने या आधीदेखील जालन्यातील स्टील उद्योजकांवर कारवाई केली होती. या कारवाईतून नेमके काय हाती आले, हे नंतर या विभागाकडून सांगण्यात येत नसल्याने कारवाईबाबतही गौडबंगाल आहे काय, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. अशा प्रकारच्या कारवाईने सर्वत्र संशयाचे धुके निर्माण होत आहे, त्यामुळे आयकर असो की जीएसटी नंतर सर्व खुलासा करून कारवाईत काय हाती आले किंवा क्लीन चीट दिली, हे जाहीर निवेदनाद्वारे सांगितल्यास सर्वसामान्यांमध्ये गैरसमज पसरणार नसल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.