जालना : प्राप्तिकर विभागाकडून सलग तिसऱ्या म्हणजेच शुक्रवारी शहरातील एका सहकारी बँकेसह उद्योजक, व्यापाऱ्यांच्या निवासस्थानी चौकशी करण्यात आली. औद्योगिक वसाहतीतील अन्य एका कंपनीत जाऊन झडती घेण्यात आली आहे. बनावट व्यवहारातून केलेल्या बिलांमधून मोठी माया उघड होण्याची दाट शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बुधवारी जालन्यात विवाह सोहळ्याचे स्टिकर मोटार गाड्यांवर लावून प्राप्तिकर विभागाच्या शंभरपेक्षा अधिक गाड्यांमधून दाेनशेपेक्षा अधिक अधिकारी, कर्मचारी जालन्यात पोहोचले होते. त्यांनी जालन्यातील दहा ते बारा उद्योजक, व्यापारी तसेच व्याजाने अर्थपुरवठा करणाऱ्या ब्रोकरच्या घरावर छापे टाकून मोठी रोकड जप्त केल्याची चर्चा शहरात वाऱ्यासारखी पसरली आहे. परंतु याला अधिकृततेची मोहर नसल्याने या सर्व वावड्या असल्याचे सांगण्यात आले.
दुसरीकडे शुक्रवारी प्राप्तिकर विभागाचे आणखी काही बडे अधिकारी दाखल झाल्याची चर्चा असून, सहकारी बँकेच्या लॉकरची कसून चौकशी केली जात आहे. हे सर्व व्यवहार करताना बनावट कंपन्यांच्या नावे बिलिंग करून बेहिशेबी व्यवहार करण्यात आल्याचे तपासात आढळून आल्याचे सूत्रांनी सांगितले. या व्यवहारांच्या मूळ पावत्या, मागणी नोंदविलेले रेकॉर्ड याचा ताळमेळ बसत नसल्याचे दिसून आले. मध्यंतरी बनावट बिले सादर करून ब जीएसटीचे इनपुट मिळविल्या प्रकरणी देखील येथील स्टील उद्योजकांवर संशय व्यक्त केला होता. नाशिक येथील जीसटीच्या पथकाने आठवडाभर तळ ठोकून ही चौकशी केली होती. परंतु त्यातून काहीच हाती आले नव्हते.
औरंगाबादच्या व्यापाऱ्यांची चौकशीजालन्यातील स्टील उद्योगाला लागणारा कच्चा माल अर्थात स्क्रॅप हा औरंगाबादेतील दोन व्यापाऱ्यांकडून पुरविला जात असल्याच्या संशयावरून त्यांचीही चौकशी करण्यात येत आहे. असे असले तरी या एवढ्या मोठ्या कारवाईविषयी माध्यमांना कुठलाच जबाबदारी अधिकारी अधिकृत माहिती देत नसल्याने या कारवाईबाबत अनेक तर्कवितर्क हे केवळ चर्चेचवरच लावले जात आहेत.