गेल्या काही महिन्यांपासून या रुग्णालयामध्ये कोरोनाबाधितांसह अन्य रुग्णांवर उपचार केले जात आहेत. असे असताना रुग्णालयाने सांडपाण्याचे नियोजन शास्त्रशुद्ध पद्धतीने करणे गरजेचे होते. परंतु, तसे न करता रुग्णालयाच्या पाठीमागील असलेल्या खुल्या मैदानामध्ये सांडपाणी सोडले आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्याची तक्रार जवळपास सात ते आठ रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. याची दखल घेऊन संबंधित रुग्णालयास सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्याचे निर्देश महिनाभरापूर्वीच प्रशासनाने दिले होते. परंतु, अद्यापही त्याबाबत कुठलीच उपाययोजना केली नसल्याचे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, याबाबत रुग्णालयाचे डाॅ. किशोर टेपले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आम्ही कुठल्याही प्रकारचे अतिक्रमण आणि अशुद्ध पाणी सोडलेले नाही. नागरिकांची तक्रार असल्यास आपण त्याची दखल घेऊन योग्य ती काळजी घेऊ. याबाबत आपण नगरपालिकेलाही भूमिगत गटार योजना राबवावी, असे पत्र दिल्याचेही ते म्हणाले.
रुग्णालयाच्या सांडपाण्यामुळे गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 4:27 AM