फोटो
धावडा : भोकरदन तालुक्यातील धावडा येथे प्रवाशांसाठी निवारा, बसस्थानकाची सोय नाही. त्यामुळे ऊन, वारे, पावसाचा सामना करीतच येथील प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. याचा सर्वाधिक त्रास अबालवृद्धांसह महिलांना सहन करावा लागत आहे.
विदर्भ- खानदेशाला जोडणाऱ्या अजिंठा- बुलडाणा राष्ट्रीय महामार्गावर धावडा (ता.भोकरदन) हे गाव वसलेले आहे. येथील बसस्थानकावर प्रवासी निवारा किंवा बसस्थानक नाही. बसस्थानक नसल्याने प्रवाशांना थंडी, ऊन, पावसाचा सामना करीतच बसची प्रतीक्षा करावी लागते. १२ हजार लोकसंख्येच्या धावडा गावाशी परिसरातील दहा गावातील नागरिक, व्यापारी, शेतकरी, विद्यार्थ्यांचा संपर्क येतो. येथे बसच्या १३ फेऱ्या होतात. बुलढाणा, नागपूर, अकोला, जळगाव, भुसावळ, चाळीसगाव, नाशिक, मुंबई, औरंगाबाद, जालना, भोकरदन, सिल्लोड आदी शहरी भागात जाणाऱ्या बसेसची संख्या मोठी आहे. या बसेसमधून या भागातील शेकडो प्रवासी दैनंदिन प्रवास करतात. मात्र, येथे प्रवासी निवारा नसल्याने प्रवाशांना रस्त्यावर किंवा हॉटेलच्या शेडमध्ये उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागते. बसस्थानकावर इतर वाहने, दुचाकी उभ्या राहतात. त्यामुळे बस थांबण्याची निश्चित जागाही नाही. बस कुठेही थांबत असल्याने महिला प्रवाशांना, वृद्धांना, विद्यार्थ्यांना आपले साहित्याचे ओझे घेऊन पळत जाऊन बस पकडावी लागते. पावसाळ्यात याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे गावात बसस्थानकाची निर्मिती करावी, अशी मागणी होत आहे.
भाविकांचीही होतेय गैरसोय
धावडा व परिसरातील भाविक, पर्यटक अजिंठा लेणी, लोणार सरोवर, गजानन महाराजांचे शेगाव, चक्रधर स्वामींचे जाळीचा देव आदी ठिकाणी सतत जातात. या भाविकांसह पर्यटकांनाही बसस्थानक नसल्याने गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.