लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कधी अस्मानी, तर कधी सुलतानी संकटांचा सामना करणाऱ्या जनतेवर पाण्याचे दुर्भिक्ष हे नवे मोठे संकट उभे राहिले होते. परंतु, मागील आठ दिवसांपासून जिल्हाभरात परतीच्या जोरदार पावसाने हजेरी लावल्याने पाण्याचे मोठे संकट टळले आहे. पावसामुळे भूजलपातळीतही वाढ झाली असून, ०.७४ मीटरने भूजलपातळी वाढली आहे, दरम्यान, जिल्ह्यातील भोकरदन तालुक्याच्या भूजलपातळीत सर्वाधिक २.२६ मीटरने वाढ झाली आहे, तर मंठा, जालना, बदनापूर तालुक्यांची पाणी पातळी अजूनही कमी आहे.सतत दुष्काळ पडत असल्याने वेगाने पाणीपातळीत घट होत असल्याचे भीषण वास्तव पुढे आल्याने भूगर्भ पाण्याने कसे भरायचे, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, यावर्षी भोकरदन तालुका सोडता इतर तालुक्यांमध्ये भर पावसाळ््यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत होता. त्यामुळे विहिरी, बोअर कोरडेठाक पडले होते. परिणामी, तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु, मागील आठ दिवसांपासून जिल्हाभरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसाने नद्या, नाल्यांना पाणी आल्याने काही प्रकल्पही तुडूंब भरले आहे.या पावसामुळे भूजल पातळीतही वाढ झाली आहे. भूजल विभागाच्यावतीने जिल्हाभरातील ११० विहिरींचे निरीक्षण करण्यात आले. त्यापैकी २४ विहिरींच्या पाणी पातळीत घट होती. तर ८६ विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचे समोर आले. दरम्यान जालना, बदनापूर, अणि मंठा तालुक्यांच्या पाणी पातळीत अजूनही घट आहे. जालना तालुक्यातील १५ विहिरीपैकी ९ विहिरीत घट तर ६ विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. बदनापूर तालुक्यातील १२ विहिरींपैकी ६ मध्ये वाढ तर सहामध्ये घट आहे. मंठा तालुक्यातील १० विहिरींपैकी ५ मध्ये वाढ तर पाचमध्ये घट आहे. दरम्यान, परतूर, भोकरदन, घनसावंगी, जाफराबाद तालुक्यातील सर्वच विहिरींची पाणी पातळी वाढली आहे.बदनापूर तालुक्याची पातळी सर्वात कमीभोकरदन तालुक्यात जुनच्या सुरुवातीपासूनच पाऊस पडत असल्याने भोकरदन तालुक्याच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. भोकरदन तालुक्याची पाणीपातळी २.२६ मीटरने वाढली आहे. तर जाफराबाद १.३९, परतूर १.७२, घनसावंगी तालुक्याची पाणीपातळी १.३८ ने वाढली आहे. दुसरीकडे जालना -०.८५, बदनापूर -०.१३, अंबड ०.३१, मंठा तालुक्याची पाणीपातळी - ०.१४ आहे.
परतीच्या पावसाने भूजल पातळीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2019 12:58 AM