- फकिरा देशमुख
भोकरदन : राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमध्ये महाराष्ट्रभर सवलतीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करण्याची संधी आहे. त्यामुळे अनेक महिलांनी आधारवर स्वत:चे वय वाढविले होते. मात्र, आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ६५ वर्षांची अट ठेवली आहे. त्यामुळे आधारवर पुन्हा वय कमी करण्यासाठी महिलांची सीएससी सेंटरवर गर्दी वाढली आहे.
यात काही महिलांनी एसटीच्या प्रवासाचा फायदा घेण्यासाठी बनावट आधारकार्ड बनवले. त्यामुळे एसटीतून प्रवास करताना बनावट, तर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ओरिजनल आधार वापरणार आहेत.
सेतू केंद्रांवर वय कमी करण्यासाठी महिलांची गर्दीराज्य शासनाने २१ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना लागू केली आहे. त्यामुळे आधारकार्डवर ६५ पेक्षा अधिक वय असणाऱ्या महिलांनी वय कमीसाठी गर्दी केली.
आधार अपडेटसाठी काय कागदपत्रे लागतात?आधारकार्ड अपडेटसाठी महिलांना वयाचा पुरावा म्हणून टीसी, ग्रामपंचायत कार्यालयाचा रहिवासी दाखला आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मोबाइल क्रमांकही अनिवार्य आहे.
तालुक्यात ज्येष्ठ महिलांची संख्या मोठी: भोकरदन तालुक्यात राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमध्ये मोफत प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ महिलांची संख्या मोठी आहे. आता प्रवासापेक्षा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे अनेक महिला आपले आधारकार्डवरील वय कमी करण्यासाठी गर्दी करीत आहेत. राज्य शासनाने लाडकी बहिण योजनेची घोषणा केल्यानंतर भोकरदन तालुक्यातील सर्वच सीएससी सेंटरवर वय कमी करण्यासाठी महिलांची गर्दी दिसून येत आहे. काही ठिकाणी तर रांगा लागत असल्याचे दिसून येत आहे. आधारकार्ड अपडेट करण्यासाठी किमान २१ दिवसांचा कालावधी लागत आहे.
सेतू केंद्र चालक काय म्हणतात....- बसमधील मोफत प्रवासाचा लाभ घेण्यासाठी महिलांनी आधारकार्डवर ६५ वर्षांपेक्षा अधिक वय वाढवले आहे. आता ते कमी करीत आहे. - पवन राजू मोरे, सेतू केंद्र चालक
- लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महिलांनी ओरिजनल आधारकार्ड बाहेर काढले आहे. एसटीसाठी बनावट केल्याचे दिसले. - योगेश शेंद्रे, सेतू केंद्र चालक