लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गामुळे राज्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. परंतु, टकाटक असलेल्या या महामार्गावर काही वाहनचालक वेगमर्यादेपेक्षाही वेगाने वाहने चालवत आहेत. वाहनचालकांची ही बेफिकिरीच अपघातांना निमंत्रण देणारी ठरते आहे.
समृद्धीवर गेल्या १७ दिवसांमध्येच ५६ वाहनांना अपघात झाला असून, दोन ठार तर २७ जखमी झाले आहेत. दोन ठिकाणी वाहनांना आगीही लागल्या. शिवाय, १० वाहनांचे टायर फुटले. ७५ घटनांमध्ये वन्यप्राण्यांना दुखापत झाली असून ४० पेक्षा अधिक जनावरे जखमी, तर ३५ पेक्षा अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे, असे महामार्ग पोलिसांकडून सांगण्यात आले.
या वाहनांचे सर्वाधिक अपघात
समृद्धी महामार्गावर गेल्या १७ दिवसांत ५६ अपघात झाले. यात सर्वाधिक अपघात हे कारचे होते. त्यानंतर कुलझर, ट्रक, आयशर आदी वाहनांचे अपघात झाले आहेत.
कशामुळे होतात अपघात
- वेगमर्यादेचे उल्लंघन - अचानक वन्यप्राणी समोर आल्याने - वाहनाचे टायर फुटणे - चालकाला झोप लागणे
या महामार्गावर १२० पर्यंत वेग
महामार्गावर १२० पर्यंत वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे; परंतु, लोक अतिवेगाने वाहने चालवतात. त्यामुळे समृद्धी महामार्गाने वाहने चालविताना वाहनधारकांनी वेगमर्यादेचे पालन करावे, असे आवाहन महामार्गाचे स.पो.नि. अभय बी. दंडगव्हाळ यांनी केले आहे. अपघातातील जखमींना तत्काळ मदत मिळावी, यासाठी महामार्गावर ठिकठिकाणी टोल फ्री क्रमांकाचे फलक आहेत. वाहनधारकांनी १८००२३३२२३३ व ८१८१८१८१५५ यावर कॉल केला तर काही मिनिटांत मदत मिळते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"