लोकमत न्यूज नेटवर्कजालना : माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी देशाच्या ऐक्य आणि अखंडतेसाठी दिलेले बलिदान देश कधीही विसरू शकणार नाही. त्यांनी भारत देशाला जगाच्या पाठीवर नेण्यासाठी केलेले अमूल्य कार्य आणि गोरगरीब, दीनदलितांच्या उध्दारासाठी महान कार्य केले आहे, असे प्रतिपादन जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख यांनी केले.जालना जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार कैलास गोरंट्याल यांच्या प्रितीसुधानगर येथील कार्यालयात गुरूवारी स्व. इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आणि लोह पुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी मान्यवरांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल होत्या. यावेळी जालना शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, न.प.गटनेते गणेश राऊत, नगरसेवक महावीर ढक्का, राजेंद्र वाघमारे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.यावेळी पुढे बोलताना राजेंद्र राख म्हणाले की, भारत देश हा आज तंत्रज्ञान, विज्ञानामध्ये अग्रेसर आहे. याचा पाया स्व. इंदिरा गांधी यांनी रचल्यामुळे भारत देश हा स्वयंभू राष्ट्र म्हणून जगापुढे आलेले आहे. स्व. इंदिरा गांधी यांनी गोरगरीबांच्या कल्यासाठी विविध योजना आणि महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे देशातील युवक आज शिक्षणाकडे वळलेला आहे. यावेळी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल म्हणाल्या की, स्व. इंदिरा गांधी यांनी राष्ट्राच्या एकात्मतेसाठी आपले जीवन समर्पित केले आहे, ही बाब भारतीय नागरीक कधीही विसरणार नाही. भारत देश एकसंघ राहावा म्हणून त्यांनी दिलेले बलिदान काँग्रेस पक्षाला पुढे न्यायचे आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी समतेचे विचार घेवून सामाजिक कार्यात अग्रसेर राहावे आवाहन त्यांनी यावेळी केले.देशाचे तत्कालीन गृहमंत्री स्व. वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या हितासाठी घेतलेले धाडसी निर्णय आणि निजामाच्या राजवटीतून मराठवाड्याला मुक्तता मिळवून दिली. त्यांचे हे महान कार्य देश कधीही विसरू शकणार नाही, असे त्या म्हणाल्या.यावेळी शहराध्यक्ष शेख महेमूद, गटनेते गणेश राऊत यांनी विचार मांडले. यावेळी नगरसेवक आरेफ खान, रमेश गोरक्षक, राधाकिसन दाभाडे, विनोद यादव, वैभव उगले, मोहन इंगळे, जगदीश ऐंगूपटला, राजू पवार, नारायण वाढेकर, शेख इस्माईल, रामेश्वर पवार, सीताराम विटेकर, अंकुश गायकवाड, राजू साबळे, शेख अकबर आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन युवक काँग्रेसचे किशोर शिंदे यांनी केले.
इंदिराजींचे बलिदान देश विसरणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2019 1:13 AM