जालना : कोरोना महामारीमुळे एकुणच मानवी जीवनासह औद्योगिक क्षेत्रावरही विपरीत परिणाम झाला आहे. आता परिस्थितीत हळूहळू बदल होत असून कोराेनाची रुग्णसंख्या घटत आहे. कोरोनाचा मोठा फटका उद्योग क्षेत्राला बसला होता. लॉकडाऊनमुळे उद्योगाची चाके तीन महिने बंद होती.
जालना जिल्ह्याचा विचार केला असता हा जिल्हा पूर्वीपासूनच व्यापार आणि उद्योग क्षेत्रात आघाडीवर आहे. जालना शहरात बियाणे, स्टील, दालमील, सॉ - मील तसेच जिनींग उद्योग मोठ्या प्रमाणावर विकसीत झाला आहे. आजघडीला सर्वात जास्त स्टील उद्योग येथे विकसीत झाला आहे. आज देशातील बहुतांश राज्यांमधील प्रकल्पांसाठी जालन्याचे स्टील उपयोगात आणले जाते. बियाणे उद्योगानेही मोठी भरारी मध्यतंरी घेतली होती. परंतु, आज काही बोटावर मोजण्या एवढ्या कंपन्या कार्यरत आहेत.
शासनाचे धोरण देखील बियाणे उद्योगांना संशोधनासाठी पुरक नसल्याने इतर राज्यांमध्ये येथील उद्योजकांनी आपले संशोधन आणि विकास वाढविला असल्याचे दिसून येते. या उद्योग क्षेत्रासाेबतच जालन्यातील भुसार मालाची व्यापारपेठही मोठी आहे. या व्यापार पेठेलाही कोरोनामुळे फटका बसला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर उद्योगांची चाके पुन्हा गतीने फिरु लागली आहेत. जालन्यातील विविध उद्योगांमध्ये बिहार, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश येथील कामगार आहेत. कोरोनामुळे ते त्यांच्या गावी गेले होते. ते आता पुन्हा कामावर रुजू झाले असल्याने आता कामगारांची टंचाई दूर झाली आहे.
जिल्ह्यात 1000 कोटींचा फटका जिल्ह्यातील सर्वात मोठा उद्योग असलेल्या स्टील उद्योगाला 250 ते 300 कोटींचा फटका बसला असून अन्य लहान मोठ्या उद्योगांची बेरीज केली असता हे नुकसान 1000 हजार कोटीचे नुकसान झाल्याचा अंदाज उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. आता ही गाडी रुळावर येत आहे.
कुठल्या क्षेत्रात उद्योग सुरू होताहेत ?जालना येथे नवीन आणि जुनी अशा दोन औद्योगिक वसाहती आहेत. यात प्रामुख्याने बियाणे, डाळ मिल, स्टील, प्लास्टिक उद्योगांचा समावेश आहे. लघु उद्योगांमध्ये वेगवेगळा कच्चा माल मोठ्या उद्योगांना पुरविण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
किती कामगार स्थानिक व परप्रांतीय ? 9300 स्थानिक / 3700परप्रांतीय : जालना येथील विशेष करुन स्टील उद्योग वगळता अन्य उद्योगांमध्ये स्थानिक कामगार आणि कर्मचारी असल्याचे सांगण्यात आले.
स्टील उद्योगाने मोठ्या हिंमतीने कोरोनावर मात करत उत्पादन सुरु केले आहे. परंतु मागणी आणि पुरवठ्याचे गणित अद्याप पूर्वीप्रमाणे जुळले नाही. - अनिल गोयल, उद्योजक
जालना येथील सर्वात मोठा उद्योग म्हणून स्टीलचा उल्लेख करावा लागेल. या क्षेत्राने मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि शासनाला कररुपी महसूल दिला आहे.- किशोर अग्रवाल, मराठवाडा इंटरप्रिन्युअर्स असो. अध्यक्ष