लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अवैध धंद्यांचे केंद्र बनू पाहणा-या काही लॉजवरील व्यवसायाला चाप लावण्यासाठी ग्राहकांची आॅनलाईन नोंदणी करण्याची सक्ती पोलीस दलाच्या वतीने करण्यात आली आहे. जिल्ह्यातील लॉज चालकांना ग्राहकांच्या नोंदी आता आॅनलाईन कराव्या लागणार असून, लॉजवर विसाव्यासाठी येणाऱ्यांची माहिती थेट पोलिसांच्या दप्तरी जाणार आहे. विशेषत: पोलिसांची विशेष पथके या वेबसाईटची (अॅप) नियमित पाहणी करणार आहेत.देशात झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील अनेक आरोपींनी लॉजवरच मुक्काम केल्याच्या घटना आहेत. शिवाय अनेक लॉजवर अवैध धंदे बिनधास्त सुरू असल्याचेही पोलिसांच्या कारवाईतून समोर आले आहे. या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी शहर व परिसरातील लॉज चालकांची बैठक घेतली. या बैठकीत लॉज चालकांकडून त्यांच्या व्यवसायाची माहिती घेण्यात आली. पोलीस दलाच्या वतीने या सर्व लॉज चालकांना लवकरच एक अॅप किंवा बेसाईटची लिंक देण्यात येणार आहे. लॉजवर मुक्कामी येणारे ग्राहक असोत किंवा काही तास विसावा घेण्यासाठी येणारे ग्राहक असोत; या सर्वांच्या नोंदी तात्काळ आॅनलाईन कराव्यात, अशा सक्त सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या आहेत. ग्राहकांना आपल्या लॉजवरील रूम देताना त्यांची ओळख पटविण्यासाठी आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅनकार्डसह इतर आवश्यक ती कागदपत्रे घ्यावीत. घेतलेल्या कागदपत्रांची माहिती तातडीने पोलिसांनी दिलेल्या लिंकवर किंवा अॅपवर तात्काळ टाकावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. प्रथमत: जालना उपविभागातील लॉज चालकांची बैठक घेण्यात आली आहे. अनेकांना वेबसाईटची लिंकही देण्यात आली आहे. या लिंकद्वारे १५ फेब्रुवारीपर्यंत तात्काळ माहिती अपडेट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.वाहने खरेदी-विक्रीच्याही होणार नोंदीजालना शहरासह परिसरातून वाहन चोरी होण्याचे प्रकार अधिक आहेत. शिवाय शहरात जुन्या वाहनांची खरेदी- विक्री करणारे जवळपास ३० ते ३५ व्यावसायिक आहेत. या व्यावसायिकांनाही या बैठकीला बोलाविण्यात आले होते.लॉज चालकांप्रमाणेच या व्यावसायिकांनी वाहन खरेदीची आणि विक्रीची माहितीही प्रत्येक व्यवहारानंतर तात्काळ आॅनलाईन पध्दतीने भरण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत....तर होणार कारवाईअवैध धंद्यांना लगाम लावण्यासाठी जालना पोलिसांनी लॉज व वाहन खरेदी- विक्रीच्या नोंदी आॅनलाईन पध्दतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. या नोंदीवर विशेष पथके लक्ष ठेवून राहणार आहेत. जर कोणी या नोंदी करण्याकडे दुर्लक्ष केले तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.अवैध धंदे नाहीत तर नियमित नोंदणी कराबैठकीस उपस्थित असलेल्या काही लॉज चालकांनी आमच्या लॉजवर अवैध धंदे चालत नाहीत, असे सांगितले. अवैध धंदे चालत नसतील तर आॅनलाईन नोंदणी करण्यास अडचण ती काय, असा प्रश्न करीत सर्व लॉज चालकांनी आपल्या लॉजवर थांबण्यासाठी येणाºया ग्राहकांच्या नोंदी आॅनलाईन कराव्यात, अशा सक्त सूचना पोलिसांनी या बैठकीत दिल्या आहेत. लॉच चालकांनी सूचनांचे पालन करण्याची गरज आहे.
लॉजवर विसावा घेणाऱ्यांची माहिती येणार पोलीस दप्तरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 1:25 AM