घनसावंगी: ओबीसींकडून मते मिळवायची आणि त्यांच्यावरच अन्याय करायचा, ही भाजपची कूटनीती असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.माजी मंत्री आ. राजेश टोपे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी घनसावंगी येथे आयोजित ओबीसी मेळाव्यात ते बोलते होते. आ. पंकज भुजबळ, आ.राजेश टोपे, आ. रामराव वडकुते, ओबीसी सेलचे राज्यप्रमुख ईश्वर बाळबुधे, उत्तम पवार, संजय काळबंडे, सभापती रघुनाथ तौर, सभापती मंजुषा कोल्हे, नगराध्यक्षा योजना देशमुख, जयमंगल जाधव, संभाजी देशमुख, बाळासाहेब जाधव, भास्कर गाढवे, काशीनाथ मते, पंडित धाडगे, नंदकुमार देशमुख, शाम मुकणे, तात्यासाहेब मुकणे, रामदास घोगरे, कल्याण सपाटे, सुदामराव मुकणे, तात्यासाहेब चिमणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.धनंजय मुंडे म्हणाले की, भाजपने नेहमीच ओबीसी समाजावर अन्याय केला आहे. ओबीसी महामंडळ फक्त नावालाच आहे. साधा नवीन ओबीसी मंत्रीही सरकारकडून देण्यात आला नाही.भाजपामध्ये ओबीसी नेते आज कुठेच दिसत नाहीत. जो न्याय कारवाई करताना खडसे यांना लावला, त्या न्यायाने प्रकाश मेहता यांच्यावर कारवाई का केली नाही, असा सवाल उपस्थित केला. मराठा आरक्षण शांत करण्यासाठी शिवरायांचे नाव घेऊन शिवस्मारकाचे फक्त भूमिपूजन केले. तर विद्यापीठाला नाव देऊन धनगर आरक्षणाच्या विषयाला बगल दिली. ओबीसी सेलेचे बाळबुधे म्हणाले, की शरद पवार यांनी सर्व जातींना मानाचे स्थान दिले. त्यामुळेच राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली. पंतप्रधानांनी ओबीसींना फक्त प्रलोभने दिली. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या प्रलंबित आहेत.येणा-या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभे राहिले तरच ओबीसींचे उत्थान होईल, असा सूर मेळाव्यात उमटला.--------------