लोकमत न्यूज नेटवर्कजालना : ज्यावेळेस आपण लेखक लिहिण्यास सुरुवात करतो. त्यावेळेपासून लेखकाने स्वत:शी प्रश्नोत्तरे केली पाहिजेत. जेणेकरून लेखक दर्जेदार साहित्य निर्मिती करू शकतो. साहित्य निर्मितीमध्ये ज्यावेळेस साहित्यिक स्वत:ला गाढून घेतो, तेव्हाच दर्जेदार साहित्याची निर्मिती होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र गोळे यांनी केले.अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या १८ व्या प्रतिभा संगमच्या समारोप प्रसंगी रविवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून समस्त महाजन संस्थेच्या नूतन देसाई, अभाविपचे राष्ट्रीय मंत्री अनिकेत ओव्हाळ, राष्ट्रीय कला मंचचे प्रदेश प्रमुख प्रा. अनिल मस्के, प्रदेश संयोजक प्रसाद जाधव, प्रतिभासंगमचे निमंत्रक डॉ. सुनील कुलकर्णी, स्वागत समिती अध्यक्ष शिवरतन मुंदडा, समिती सदस्य सचिव सुरेश केसापूरकर, अभाविपचे शहराध्यक्ष प्रा. आनंद कुलकर्णी, शहर मंत्री अनिकेत शेळके आदींची उपस्थिती होती.अनिकेत ओव्हाळ म्हणाले, अभाविप समाजाचे प्रतिनिधित्व करत आलेले आहे. युवक हा समाजाचा आरसा असतो. तो चमकला आहे आणि यापुढेही चमकत राहिल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. या दोन दिवसीय विद्यार्थी साहित्य संमेलनात सीएएच्या बाजुने या युवा साहित्यिकांनी मांडलेल्या मतातून स्पष्ट होते की, समाज भावना कोणासोबत आहे. कोणीही शाहीनबागसारख्या समाजात फूट पाडणाऱ्या घडामोडी केल्या तरी हा देश एकसंघ राहणार आहे, असे प्रतिपादन अनिकेत ओव्हाळ यांनी केले. नूतन देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले. पारितोषिकांचे वाचन प्रा. डॉ. सुनील कुलकर्णी यांनी, सूत्रसंचालन प्रसाद जाधव यांनी तर आभार अभाविपचे शहराध्यक्ष प्रा. आनंद कुलकर्णी यांनी मानले.दरम्यान, प्रतिभा संगम साहित्य संमेलनात जालना, औरंगाबाद, लातूर, बीड, सोलापूरसह राज्यभरातील युवक कवी, कवयत्री सहभागी झाल्या होत्या. नवोदितांच्या साहित्याला उपस्थित रसिकांनीही भरभरून दाद दिली. या संमेलनातील कार्यक्रमांमधून एक चांगला अनुभव आल्याचेही या युवकांनी सांगितले.मान्यवरांच्या हस्ते गौरव : अशी आहेत विजेत्यांची नावेग्रंथ दिंडी : संस्कार प्रबोधिनी विद्यालय, जालना- प्रथम, कै बाबुराव जाफराबादकर माध्यमिक विद्यालय, जालना- द्वितीय. लेझीम पथकात श्री शिवाजी हायस्कूल, जालना प्रथम, ज्ञानदीप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जालना- उत्तेजनार्थ.वैचारिक लेखात प्रथम- सुभाष कैलास कुलकर्णी (शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर ), द्वितीय- गायत्री योगेंद्र जाधव (सि. गो . महाविद्यालय ,साक्री जिल्हा धुळे ), साहित्यप्रकारात हिंदी कविता प्रथम दिव्या मिसाळ (बारवाले महाविद्यालय जालना), द्वितीय- सुशील काकडे (भोसला मिलिटरी कॉलेज नाशिक) तर तृतीय क्रमांकाचा पुरस्कार अक्कलकोट येथील पॉलिटेक्निक महाविद्यालयातील निखिल माने यांनी मिळविला.सााहित्य प्रकारातील कथामध्ये प्रथम- पवन ठोंबरे (मोरेश्वर महाविद्यालय भोकरदन), द्वितीय- सुखानंद वैद्य (श्री शिवाजी महाविद्यालय परभणी), तृतीय- अमोल पाटील (राष्ट्रीय महाविद्यालय कन्नड जिल्हा औरंगाबाद ), साहित्यप्रकार : ललित लेखमध्ये प्रथम- तेजस खरे (गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी ), द्वितीय- पियुष लाड ( भोसला मिलिटरी कॉलेज नाशिक), तृतीय- चंद्रकांत निकम (देशमुख महाविद्यालय भडगाव जिल्हा जळगाव), साहित्यप्रकार मराठी कवितामध्ये प्रथम- चंद्रकांत निकम ( देशमुख महाविद्यालय भडगाव जिल्हा जळगाव ), द्वितीय- आदित्य गोमटे (जे इ एस महाविद्यालय जालना) तर तृतीय पुरस्कार गौतम जगताप (म स गा महाविद्यालय मालेगाव , जिल्हा धुळे) यांनी मिळविला.
नवोदित लेखकांनी स्वत:शी प्रश्नोत्तरे करावीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2020 1:00 AM