जालना : सर्व शिक्षण अभियानातून गेल्यावर्षी जिल्हा परिषदेच्या ८२ शाळांची देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात आली. त्यासाठी जवळपास साडेचार कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. हा झालेला खर्च पाण्यात गेला असून, या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जि.प.सदस्य जयमंगल जाधव आणि अन्य सदस्यांनी केली. या मागणीनुसार सीईओ निमा अरोरा यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश दिले आहेत.
मंगळवारी दुपारी जि.प.च्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात स्थायी समितीची सभा पार पडली. त्यावेळी अनेक मुद्यांवरून प्रशासन आणि सदस्यांमध्ये खडाजंगी झाली. यात प्रामुख्याने जयमंगल जाधव यांनी गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील ८२ शाळांवर देखभाल दुरुस्तीच्या नावावर खर्च करण्यात आला. हे पैसे खर्च करताना मुख्याध्यापकांकडून काही चिरीमिरी घेऊन हा निधी त्या शाळांना देण्यात आल्याचा गंभीर आरोप केल्यावर यावर बराच गोंधळ झाला. या सर्व प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी करण्यात येईल, असा निर्णय सीईओ अरोरा यांनी घेतला.
या मुद्यासह भाजपचे शालीकराम म्हस्के यांनी आरोग्य विभागाचा मुद्दा मांडून आज कोरोनाप्रमाणेच अन्य आजारही मोठ्या प्रमाणावर पसरत आहेत. त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे सांगून आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी हे मुख्यालयी राहत नसल्याचे सांगितले. यावेळी अवधूत खडके यांनी अतिवृष्टी तसेच परतीच्या पावसाने अनेक रस्ते खरडले असून, पूल वाहून गेले आहेत. याकडेही बांधकाम विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी केली. या सभेस अध्यक्ष उत्तमराव जाधव, उपाध्यक्ष पवार, उफाड, सीईओ अरोरा, अतिरिक्त मुख्याधिकारी सवडे आदींची उपस्थिती होती.
कामे दर्जेदार झाली असल्याचा दावा सर्व शिक्षण अभियानातून ज्या ८२ शाळांची देखभाल दुरुस्ती करण्यात आली आहे. ती करताना तेथील शालेय व्यवस्थापन समितीने सुचविल्यानुसार केली. जी काही कामे झाली आहेत, ती दर्जेदार झाल्याचे जि.प.चे अभियंता ढवळे यांनी दिली. असे असले तरी चौकशी होणार असल्याने त्यातून सत्य लवकरच बाहेर येणार आहे.