जालना : मंठा तालुक्यातील काही गावांत गारपिटीने झालेल्या पिकांच्या नुकसानाची जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी मंगळवारी पाहणी केली. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे तातडीने पूर्ण करून शासनास मदतीसाठी अहवाल पाठवला जाईल, असे जिल्हाधिका-यांनी शेतक-यांशी बोलताना सांगितले.मंठा तालुक्यातील गेवराई, उमरखेड, उस्वद, देवठाणा (उस्वद) या गावातील गहू, ज्वारी, हरभरा या हंगामी पिकांबरोबरच पपई, केळी, टरबूज या फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतक-यांनी जिल्हाधिकारी जोंधळे यांना सांगितले. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे तातडीने पूर्ण करून शासनाला अहवाल पाठवला जाईल. तसेच शेतक-यांना भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिका-यांनी शेतकºयांना दिली. शेतक-यांनी पीकविमा भरण्याला प्राधान्य द्यावे, असेही ते म्हणाले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, मंठ्याचे तहसीलदार राहुल गायकवाड आदींची उपस्थिती होती.---------पंचनाम्यासाठी जीपीएस प्रणालीप्रशासनामार्फत पंचनाम्यावेळी पिकांच्या नुकसानीचे छायाचित्र काढताना जीपीएस प्रणालीचा वापर करुन त्याचे जिओ टॅगिंग केले जाणार आहे. गारपिटीमुळे नुकसान झालेला एकही शेतकरी नुकसानीच्या पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी जोंधळे यांनी संबंधित अधिका-यांना दिले आहेत. जिल्ह्यातील सुमारे ३८ हजार हेक्टर क्षेत्राचे गारपिटीमुळे नुकसान झाले आहे.
नुकसानाची जिल्हाधिका-यांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 11:09 PM