लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा परिषद शाळांमधील धोकादायक, मोडकळीस आलेल्या वर्गखोल्या आणि पाणीटंचाईचा प्रश्न स्थायी समितीच्या सभेत चांगलाच गाजला. स्थायी समिती सदस्यांनी प्रश्नांचा भडीमार केल्यानंतर अध्यक्ष अनिरूद्ध खोतकर यांनी तातडीने वर्गखोल्या दुरुस्तीचे प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले. तर बंद करण्यात आलेल्या टँकरचा मुद्दाही अनेकांनी उचलून धरीत ग्रामीण भागातील पाणीप्रश्न सोडविण्याची मागणी केली.जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मंगळवारी स्थायी समितीची सभा पार पडली. यावेळी अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, उपाध्यक्ष सतीष टोपे, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी क्षिरसागर, सभापती जिजाबाई कळंबे यांच्यासह सदस्यांची उपस्थिती होती.जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या पंधराशे शाळा आहे. त्यापैकी ३७५ शाळांच्या वर्गखोल्या धोकादायक झाल्या आहे. त्यातील ७०४ वर्गखोल्या मोडकळीस आल्या आहे. अशा वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षण कसे घ्यावे, असा प्रश्न जयमंगल जाधव यांनी उपस्थित केला.एकीकडे राज्य सरकार जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. तर दुसरीकडे प्रशासन शाळांच्या वर्गखोल्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत आहे. मागील पंधरा दिवसांपासून वर्तमान पत्रांमध्ये वर्गखोल्या संदर्भात बातम्या येत आहे. तरीही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. सध्या जिल्ह्यात १००८ वर्गखोल्यांची गरज आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी जयमंगल जाधव यांनी केली.यावर उत्तर देताना अध्यक्ष अनिरुध्द खोतकर म्हणाले, काही दिवसांपूर्वीच केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी वर्गखोल्या संदर्भात विचारले होते. त्यांनी मोडकळीस आलेल्या सर्व वर्गखोल्यांचे प्रस्ताव तयार करण्याबाबत सांगितले आहे. त्यानुसार शिक्षण विभागाने येत्या आठ दिवसांमध्ये वर्गखोल्यांचे प्रस्ताव तयार करावे, असे आदेश त्यांनी दिले. तसेच जिल्ह्यात अंगणवाड्यांची गरज आहे. यासाठी आपण अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्याकडे गेले होतो. तेव्हा त्यांनी अंगणवाड्यासाठी १८ कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे सांगितल्याचे खोतकर म्हणाले. तसेच पाऊस समाधानकारक नसतानाही टँकर बंद करण्यात आले आहेत. गावा-गावातील पाणीटंचाई पाहता टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी उपस्थित सदस्यांनी यावेळी केली. या सभेला स्थायी समितीचे सदस्य, सर्व विभागाचे प्रमुख व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
धोकादायक वर्गखोल्यांचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 12:41 AM