जालना : एसआरपीएफ अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या पूर्वीप्रमाणेच कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र विधिमंडळ आश्वासन समितीचे प्रमुख आमदार कैलास गोरंट्याल यांनी बुधवारी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. या मागणीबाबत सकारात्मक विचार करून मंत्रिडळाच्या बैठकीत ठोस निर्णय घेण्यात येइल, असे आश्वासन देशमुख यांनी दिले आहे.
एसआरपीएफ ग्रुप ही राज्यात सातत्याने कार्यरत आहेत. नियमित पोलीस जवानांसोबत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या ग्रुपमधील जवान नेहमीच आघाडीवर असतात. कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यांच्या नियमांत पूर्वी दहा वर्षांच्या कार्यकालाची मर्यादा होती. मात्र, मागील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी नियमांत बदल करून हा कार्यकाळ पंधरा वर्षांचा केला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यभर एसआरपीएफ ग्रुपमधील कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आणि असंतोष पसरलेला आहे. त्यामुळे या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन बदल्यांची कार्यकालाची मर्यादा पूर्वीप्रमाणेच करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार गोरंट्याल यांनी केली आहे.
सकारात्मक प्रतिसाद
आमदार गोरंट्याल यांच्याशी झालेल्या चर्चेत गृहमंत्री देशमुख यांनी बदल्यांच्या कार्यकालाची मर्यादा पूर्वीप्रमाणेच ठेवण्यासाठी आपण सकारात्मक भूमिका घेऊ. लवकरच हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर मांडून त्याबाबत ठोस निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही गृहमंत्री देशमुख यांनी दिल्याचे आमदार गोरंट्याल यांनी सांगितले.