नागरिकांची कामे तातडीने व्हावीत, यासाठी शासकीय कामकाज संगणकांवर केले जात आहे. यासाठी शासनाकडून हजारो रुपयांचे संगणक खरेदी करण्यात आले आहे. कार्यालयातील देयके, वरिष्ठांना माहिती पाठविणे व अन्य कामे ऑनलाईन केली जातात. परंतु, येथील पंचायत समिती कार्यालयात गेल्या दोन महिन्यांपासून इंटरनेटची सेवा ठप्प आहे. याचा परिणाम कामकाजावर होत आहे. इंटरनेट बंद असल्याने ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना चकरा माराव्या लागत आहेत. यामुळे त्यांना आर्थिक भूर्दंडही सहन करावा लागत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. याबाबत कार्यालयीन अधीक्षक आढाव म्हणाले की, कार्यालयातील इंटरनेट सेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी बीएसएनएल कार्यालयाकडे नेहमी पाठपुरावा केला जातो. परंतु, त्यांच्याकडून इंटरनेट सेवा सुरू केली जात नाही. यामुळे कार्यालयीन कामकाज वेळेत पूर्ण करण्यासाठी मोठी दमछाक होत आहे. तसेच आपले सरकार पोर्टलवर कुणाची तक्रार असेल तर ती या कार्यालयात दिसत नाही, असेही ते म्हणाले.
पंचायत समिती कार्यालयात दोन महिन्यांपासून इंटरनेट सेवा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 4:42 AM