लोकमत न्यूज नेटवर्कगोंदी : गोदावरी नदीपात्रातून जवळपास एक हजार ८०० वाळूचा साठा करून तो काळ्या बाजारात विक्रीसाठी जमवून ठेवलेल्या वाळू माफियांचे मनसुबे महसूलच्या पथकाने मातीत मिसळले आहेत. नदीपात्रातील वाळू दोन दिवसांपूर्वी हसनापूर परिसरात जेसीबी, तसेच पोकलेनने हे वाळूसाठी पुन्हा गोदावरील पात्रात मिसळून एक प्रकारे गांधीगिरी केली आहे.गेल्या काही महिन्यांमध्ये अवैध वाळूचा मुद्दा सर्वत्र गाजत आहे. यावर कोणाचेच नियंत्रण राहिले नसल्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच तीन महिन्यांपूर्वी खुद्द जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, तसेच पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनी थेट गोदावरी थेट जाऊन कारवाई केली होती. मात्र नंतर यात राजकीय हस्तक्षेप होऊन नंतर वाळू माफियांविरूध्दची कारवाई थंड बस्त्यात पडली होती. असे असले तरी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी त्या भागातील मंडळ अधिकारी तसेच तलाठ्यांवर कारवाई केली होती.एकूणच दोन दिवसांपूर्वी महसूलच्या या पथकाने हसनापूर परिसरातील अवैध मार्गाने जमवलेले वाळूचे डोंगर जमीनदोस्त केल्याने वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान ही कारवाई कोणाच्या आदेशावरून करण्यात आली हे मात्र कुठलाच अधिकारी पुढे येऊन सांगत नसल्याने या बद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.हे वाळू साठे जप्त करून त्यांचा लिलाव करून त्यातून मोठा महसूल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला असता, परंतु तसे न करता नदीपात्रातील वाळूसाठे पुन्हा नदीपात्रात मिसळल्या मागील गौडबंगाल कायम आहे. अशी कारवाई यापूर्वीही करण्यात आली होती. तरीही वाळूउपसा सुरूच आहे.जालना : गौण खनिज विभागाचे दुर्लक्षजिल्हा पातळीवर अवैध वाळूचा उपसा रोखण्यासाठी गौण खनिज विभागाने भरारी पथक नेमले आहे. असे असताना त्यांना एक स्वतंत्र स्कॉर्पिओ देण्यात आली आहे. मात्र ही गाडी आता पर्यंत कुठे-कुठे कारवाईसाठी गेली याचे लॉगबुक तपासल्यास मोठ्या धक्कादायक बाबी समोर येऊ शकतात. गौण खनिज विभागाकडून या वाळूसाठ्यासंदर्भात गौण खनिज अधिकारी पाटील यांचाही मोबाईल कव्हरेज क्षेत्रात नसल्याचे दिसून आले. त्यामुळे ही हसनापूर जवळील कारवाई कशी आणि कोणी केली, हे गुलदस्त्यात आहे.
अवैध वाळूडोंगर जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 12:31 AM