जालना : आरोग्य विभागाला शुक्रवारी ३१५७ जणांच्या तपासणीचा अहवाल प्राप्त झाला असून, यात नऊ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनामुक्त झालेल्या चौघांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात ८३ सक्रिय रुग्ण असून, त्यातील काहींवर रुग्णालयात तर काहींवर अलगीकरणात उपचार सुरू आहेत.
जिल्हा आरोग्य प्रशासनाला गुरुवारी २५४९ जणांच्या तपासणीचा अहवाल प्राप्त झाला होता. त्यात २५ जणांना बाधा झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे रुग्णसंख्या वाढीची चिंता व्यक्त केली जात होती. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी मात्र, ३१५७ जणांच्या तपासणीत नऊ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात आरटीपीसीआरमध्ये ३०६८ जणांच्या तपासणीत दोघांचा, तर ॲंटिजनच्या ८९ तपासणीत सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बाधितांमध्ये घनसावंगी तालुक्यातील उढाण कंढारी-१, अंबड तालुक्यातील बरसवाडा- १, वडीगोद्री- ४, चुर्मापुरी- २ व शहागड येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या ६१ हजार ४४४ वर गेली असून, त्यातील ११७९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आजवर ६० हजार १८२ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
४५२० अहवालांची प्रतीक्षा
आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात आलेल्या ४५२० जणांच्या तपासणीचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे. या तपासणी अहवालात किती जणांचा अहवाल पॉझिटिव्ह येतो, याकडे लक्ष लागले आहे. रुग्णांची संख्या घटली असली, तरी नागरिकांनी मास्कचा वापर, सुरक्षित अंतरासह इतर सूचनांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.