लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आपल्याकडे असलेली शिल्लक रक्कम अथवा संपत्तीतून नेमकी कुठे गुंतवणूक करावी, हा आज महत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे म्युच्युअल फंड हा एक उत्तम पर्याय निर्माण झाला आहे. यातील गुंतवणूक म्हणजे एकप्रकारे निवृत्ती वेतन मिळाल्याप्रमाणे या गुंतवणुकीचा परतावा मिळतो, असा सूर उपस्थित आदित्य बिर्ला सन लाईफच्या अर्थतज्ञांकडून ऐकण्यास मिळाला.येथील मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात नुकताच लोकमत आणि आदित्य बिर्ला सन लाईफतर्फे निवेश उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिपप्रज्वलन पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य नामदेव चव्हाण, बिर्ला सन लाईफचे सुहास राजदेकर, निलेश चव्हाण, अंकुशराव टोपे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. आर. गायकवाड, सी.ए. सागर कावना, अर्थतज्ज्ञ प्रा. मारोती तेगमपुरे, शाखा व्यवस्थापक दीपक कदम, जिल्हा प्रतिनिधी संजय देशमुख, लोकमत टाईम्सचे जिल्हा प्रतिनिधी अहेमद नूर आदींची हस्ते करण्यात आले.प्रारंभी मान्यवरांचा शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. अशा प्रकारे निवेश उत्सव लोकमत आणि आदित्य बिर्ला ग्रुपच्यावतीने आयोजित केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त करुन गुंतवणूक आणि त्याची सुरक्षितता तसेच भविष्यातील त्याचे महत्व अत्यंत साधे आणि सोप्या भाषेत पटवून दिले. उपस्थितांनी त्यांना पडणारे प्रश्न अर्थतज्ज्ञांना विचारुन शंकाचे निरसन केले.लोेकमत आणि आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंड यांच्या संयुक्त विद्यमाने बचत व गुंतवणुकीच्या संधी संदर्भात लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘निवेश उत्सव’ हा कार्यक्रम पार पडला. म्युचुअल फंड, व्यावसायिक व्यवस्थापन, पारदर्शकता, रोकड सुलभता आणि मजबूत नियामक आराखडा यासंदर्भातील लाभाची गुंतवणूकदारांना या मेळाव्यातून जाणीव झाली. गुंतवणूक कुठे करावी तसेच त्याचे फायदे तोटे हे या मेळाव्यातून सांगण्यात आले. त्यात प्रामुख्याने पूर्व प्रारंभ आणि चक्रवाढ व्याजातून मिळणारा लाभ, तरुण वयात उच्च शिक्षणाकरिता गुंतवणूक इत्यादीसारख्या योजनेत गुंतवणूक करतांनाच गुंतवणूकदार अतिरिक्त लाभ कसे मिळवू शकतात यावरही सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी नागरिकांसह महिलांची मोठी उपस्थिती होती.लोकमत आणि आदित्य बिर्ला सनलाईफतर्फे जालन्यातील गुंतवणूक मेळाव्यास मोठा प्रतिसाद मिळाला.असे कार्यक्रम नियमित झाल्यास गुंतवणूक वाढीसह कुठे गुंतवणूक करावी या संदर्भात फायदा होणार आहे.निवेश उत्सवसारखे कार्यक्रम घेतल्यास त्यातून अर्थसाक्षरता वाढेल असे तज्ञांनी सांगितले.
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक दीर्घकाळ फायदेशीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 12:59 AM