लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आयपीएल क्रिकेट सामन्यांवर जालन्यात मोठ्या प्रमाणात सट्टा सुरू असल्याचे पोलीस कारवायांमधून सातत्याने समोर येत आहे. बुधवारी रात्री गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील इन्कम टॅक्स कॉलनीतील एका घरात छापा टाकून संशयित प्रशांत दादाराव म्हस्के (३०) यास ताब्यात घेतले. प्रशांत मुंबईतील तिघांशी सातत्याने संपर्क करून सट्टा लावत असल्याचे चौकशीत समोर आले.इन्कमटॅक्स कॉलनीत एका घरात आयपीएल सामान्यांवर सट्टा लावला जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. प्राप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला असता, संशयित प्रशांत म्हस्के हा घरातील एका खोलीमध्ये टीव्हीवर सुरू असलेल्या चेन्नई सुपर किंग्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या दरम्यानच्या क्रिकेट सामन्यांवर मोबाईलच्या माध्यमातून पैसे लावून सट्टा खेळताना मिळवून आला. चौकशीत त्याने मुंबईत बसलेल्या भोलू सिंधी, रितेश चौधरी व ललित हार्देकर (तिघे, मूळ रा. जालना) यांच्याशी संपर्क करून क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावत असल्याचे सांगितले. पोलिसांनी चौघांविरुद्ध कदीम जालना पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, कर्मचारी कैलास कुरेवाड, सॅम्युअल कांबळे, प्रशांत देशमुख, सचिन चौधरी, विष्णू कोरडे, बनसोडे, वसंत राठोड यांनी ही कारवाई केली.
जालन्यातील आयपीएल सट्ट्याचे कनेक्शन मुंबईशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 1:15 AM