मंठा : येथील लघुपाटबंधारे उपविभाग कार्यालयात अनेक दिवसांपासून सर्व कर्मचारी गैरहजर असल्याचे पहावयास मिळते. एकच शिपाई कार्यालयात उपस्थित असतो. हे कार्यालय असून अडचण आणि नसून खोळंबा असेच म्हणावे, लागत असल्याचे सरपंच अमरशिंग राठोड यांनी सांगितले आहे.
मंठा येथील लघुपाटबंधारे उपविभाग हे कार्यालय या अगोदर वाटूर फाटा याठिकाणी होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यानंतर हे कार्यालय मंठा येथे तालुक्याच्या ठिकाणी हालवण्यात आले. परंतु या ठिकाणचे उपविभागीय अधिकारी डी. एन. श्रीवास्तव हे औरंगाबादला आणि इतर शाखा अभियंता व्ही डी. वाघमारे, सहाय्यक अभियंता काझी, काळे, सोळंके, अभियांत्रिकी सहाय्य, कनिष्ठ लिपिक नागरे हे सर्व कर्मचारी बाहेरगावी वास्तव्यास असतात त्यामुळे कार्यालयात फक्त शिपाई सानप हेच हजर राहत असल्याचे सरपंच राठोड यांनी सांगितले. अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील अनुपस्थितीमुळे तालुक्यातील तलावांची कामे रखडली आहेत.
मंठा तालुक्यात खोरड सावंगी, तळतोंडी, बरबडा, पाटोदा या धरणांची कामे अर्धवट असल्याने या तलावासाठी शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमीन शासनाने अधिग्रहण केलेल्या आहेत. त्या जमिनीमध्ये खोद काम झाल्याने शेतकऱ्यांना वापरताही येत नाहीत. शासनाकडून पूर्ण मोबदलाही मिळाला नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
-------------------
आमची कामे कार्यालयामध्ये बसून काम करण्याचे नव्हे, ज्या ठिकाणी पाटबंधारेची कामे सुरू असतात, तिथे आम्हाला जावे लागते. शाखा अभियंता वाघमारे सर्व काम करुन मला औरंगाबादला अहवाल देतात. शेतकऱ्यांच्या दस्त नोंदणीसाठी लागणारे प्रमाणपत्राचे काम सहकारी कर्मचारी करतात.
--डी एन श्रीवास्तव - उपविभागीय अधिकारी लघुपाटबंधारे विभाग मंठा.
------------------
आघाडी सरकारने पाच दिवसांचा आठवडा करुन मोठी घोड चूक केली असून या कार्यालयात अधिकारी कर्मचारी त्याचा गैरफायदा घेत आहेत.लघुपाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी श्रीवास्तव हे कार्यालयात कधीच उपस्थित नसतात त्यामुळे इतर शाखा अभियंता आणि कर्मचारीही कोणी कार्यालयात थांबत नाहीत. या प्रकाराविरूद्ध कार्यालयाला टाळे ठोकून मनसे स्टाईलने आंदोलन करू.
--गणेश बोराडे, मनसे तालुका अध्यक्ष मंठा.
--