जालना : जालना तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील इंटरचेंज पाँईट (चढ-उतारस्थळ) जामवाडी परिसरात व्हावा शेतक-यांनी मंगळवारी जालना-देऊळगावराजा मार्गावर सकाळी रास्तारोको आंदोलन केले. आंदोलनामुळे या मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.
जामवाडी, श्रीकृष्णनगर, पानशेंद्रा येथील शेतक-यांनी या रास्तारोको आंदोलनात सहभाग घेतला. दोन वर्षांपूर्वी समृद्धी महामार्गाच्या मोजणीस सुरुवात झाल्यानंतर जामवाडी, श्रीकृष्णनगर शिवारात इंटरचेंज पाँईट उभारणीचे नियोजित असताना, काही उद्योजक व पुढारी अधिका-यांना हाताशी धरून हे स्थळ बदलण्याच्या तयारीत आहेत, असा आरोप या वेळी शेतक-यांनी केला. इंटरचेंज याच भागात व्हावा, असे निवेदन नायब तहसीलदार संदीप ढाकणे यांना देण्यात आले. निवेदनावर शिवाजी वाढेकर, विठ्ठल इंगळे, ईस्माईल गफार, संदीप बडदे, बिभिषण बडदे, विजय वाढेकर, राधाकिसन वाढेकर, राजेंद्र वाढेकर, सुरेश वाढेकर, बाबू पाचरणे, रमेश इंगळे आदींच्या स्वाक्ष-या आहेत.