लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : जाफराबाद शहरातील अवैध पार्किंगमुळे दररोज वाहतूक कोंडी होत आहे. याकडे नगर पंचायत व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने पादचाऱ्यांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.जाफराबाद शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे. शहरातील वाहनांच्या संख्येतही वाढ होत असल्याने पार्किंगची समस्या उद्भवत आहे. त्यातच वाहनधारक रस्त्यावर वाहने उभा करीत आहे. त्यामुळे शहरवासियांना दररोज वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.शहरात पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहनधारक रस्त्यावर वाहने उभा करीत आहे. मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी नियबाह्य दुकाने थाटण्यात आली आहेत. याकडे नगर पंचायत व पोलीस विभागाचे दुर्लक्ष दिसत आहे.शिवाय एखादा सण उत्सव असल्यास दुकानाची संख्या अधिक वाढते. त्यामुळे प्रमुख रस्त्याचा वापर हा वाहन पार्किंगसाठीच केला जातो.शहरात अधिकृत वाहनतळ नसल्याने बेकायदा पार्किंगला बळ मिळत आहे. रस्त्याच्या कडेला तात्पुरत्या उभ्या केलेल्या वाहनांवर पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली जात नाही.वाहनतळाची सुविधा उपलब्ध नसल्याने कामानिमित्त ग्रामीण भागातून येणारे वाहनधारक रस्त्यावरच वाहने उभी करीत आहे. याचा त्रास मात्र इतरांना सहन करावा लागत आहे.
जाफराबाद शहरातील पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2019 1:13 AM