जालना : आज जो-तो लठ्ठपणा कमी करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यात उपवासही करण्यावर अनेकांचा भर असतो; परंतु साबुदाण्यापासून आपल्या शरीराला अधिक प्रमाणात कॅलरीज मिळतात. शिवाय शाबुदाणा पचनास जड असल्याने शारीरिक त्रासही होतो. त्यामुळे उपवासामध्ये शाबुदाण्याऐवजी भगर, दुधाचे पदार्थ यांसह इतर पौष्टिक पदार्थ समाविष्ट करणे अधिक फायदेशीर ठरणारे असते.
दर का वाढले?
सध्या बाजारपेठेत मालाची आवक कमी झाली आहे. त्यात कोरोनामुळेही व्यवहारावर मोठे परिणाम झाले आहेत. यामुळे बाजारपेठेत सध्या उपवासासाठी लागणारी भगर, साबुदाणा, नायलॉन शाबुदाण्यासह इतर खाद्यपदार्थांच्या दरात तेजी आल्याचे व्यापारी सांगतात.
साबुदाण्यात कॅलरी अधिक, पचनास जड
साबुदाणा हा अन्नपदार्थ मानवी शरीरात पचण्यास विलंब होतो. शिवाय तो जड पदार्थ असतो. साबुदाण्यामध्ये अधिक कॅलरी असतात. त्यामुळे लठ्ठपणा कमी करणाऱ्यांसाठी तो चांगला नाही. त्याशिवाय इतरही काही परिणाम शाबुदाणा खाल्ल्याने शरीरावर होत असल्याचे दिसून येते.
उपवास आहे, मग हे पदार्थ खा !
उपवास करीत असाल तर पौष्टिक पदार्थ खाल्लेले चांगले. यामध्ये भगर, राजगिरा, शिंगाडा, दूध व दुधाचे पदार्थ, शेंगदाणा लाडू हे पदार्थ उपवासाच्या दिवशी घ्यावेत. त्यामुळे शरीराला मोठा लाभ होतो. शिवाय भरपूर पाणी पिणेही फायरेशीर ठरते.
- डॉ. व्ही. व्ही. पिंगळे, आहारतज्ज्ञ