लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा विभागातील यांत्रिकी शाखेतील कनिष्ठ सहायक पंकज चौधरी यांनी धनादेश तयार करताना एक शून्य वाढवून ते परस्पर स्वत:च्या खात्यात वर्ग केल्याचे पुढे आले आहे. याची चौकशी सुरू असून, प्रथमदर्शनी हा व्यवहार १७ लाख रूपयांचा असल्याचे दिसून आले.जालना जिल्हा परिषद गेल्या काही महिन्यांपासून या ना त्या कारणाने चर्चेत राहिली आहे. यापूर्वी निवडणुकीच्या धामधुमीत निकष डावलून कोट्यवधी रूपयांची टेंडर भरून त्यांना मंजुरी देण्याच्या मुद्यावरून खुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी याची चौकशी सुरू केली होती. नंतर ही चौकशी थंड बस्त्यात गेली. दरम्यान हे सर्व होत असतांना जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातून धनादेश चोरीचे प्रकरण चांगलेच गाजले होते. या प्रकरणात अद्यापही पोलिसांना आरोपीचा शोध लागला नसून, यातील एका आरोपीचे निधन झाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.हे दोन्ही गंभीर प्रकारासह रोजगार हमी योजनेतून विहीर खोदण्याच्या कामातही असाच गोंधळ सुरू आहे. या प्रकरणात परतूर तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्यांवर ठपका ठेवला आहे. परंतु इतर तालुक्यांतील अनेक रस्ते कामांची बोगस बिल उचलल्या प्रकरणी प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.नवीन घोटाळ्यात आता पंकज चौधरी यांनी कर्मचाºयांचे निवृत्तीवेतन तसेच जीपीएफ आणि विमा हप्ता यांची बिले काढतांना जर एखाद्याचे बिल हे दहा हजार रूपयांचे असेल तर ते एक लाख रूपयांचे करून तो धनादेश येथील जिल्हा परिषदेचे खाते असलेल्या एसबीआय शाखेत वर्ग केला. विशेष म्हणजे हे सर्व होत असतांना तो सरकारी धनादेश असतांना धनादेशात स्वत:चे नाव समाविष्ट करून पेड बाय चौधरी अकाऊंट असे लिहून तो धनादेश वटवल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल सीईओ निमा अरोरा यांनी घेऊन तीन अधिकाºयांची चौकशी समिती नेमली आहे. या समितीने प्रथमदर्शनी माहिती घेतली असता, हे प्रकरण १७ लाख रूपयांचे असल्याचे दिसून आले. या प्रकरणात बँकेकडूनही खुलासा मागविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.पाणीपुरवठा : अहवालाची प्रतीक्षा कायमपंकज चौधरी धनादेश प्रकरणाची चौकशी सुरू आहे. परंतु अद्याप आल्याकडे अहवाल आला नसल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सीईओ अरोरा यांनी दिली. एकूणच पूर्ण चौकशी झाल्यावर सभागृहाला याची माहिती देऊन नंतर पंकज चौधरीसह त्यात गुंतलेल्यांवर कारवाई केली जाईल असे अरोरा यांनी सांगितले.
१७ लाख रुपये परस्पर वळविल्याचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 12:46 AM