जाफराबाद : अभिनेता आमिर खान यांच्या पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१८ साठी जाफराबाद तालुक्याची निवड करण्यात आली आहे. पाणी फाऊंडेशन महाराष्ट्रभर हा उपक्रम राबवीत असून, या वर्षाकरिता पाणी फाऊंडेशनने जवळपास ७५ तालुक्यांची निवड केली आहे. त्यात जाफराबादचा समावेश करण्यात आला आहे. तालुक्यात राबविण्यात येणा-या उपक्रमांची माहिती देण्यासाठी १८ व १९ डिसेंबरला तहसील कार्यालयात दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.‘पाणी फाऊंडेशन’ हे जाफराबाद तालुक्यातील पाणीटंचाई प्रश्न सोडविण्यासाठी गावागावात लोकांना प्रोत्साहित करून मृद व जलसंधारण, पाणलोट व्यवस्थापनाची शास्रशुद्ध पद्धत, उत्तम कामगिरी करण्यासाठी आणि विषयातील विज्ञानात लोकांना प्रशिक्षण देणार आहे. त्यातून गाव, तालुका टँकरमुक्त करणे, जलसंधारण कामाची लोकचळवळ, गावाच्या विविध प्रश्नांवर काम करणा-या सेवाभावी संस्था, लोक सहभागातून उभी केली आहे. स्पर्धेच्या काळात जलसंधारण, आणि पाणलोट व्यवस्थापनाची उत्तम कामगिरी करणाºया वेगवेगळ्या गावांसाठी ही स्पर्धा असून याची आतापासून तालुक्यातील सर्व गावांना तयारी करावी लागणार आहे. प्रत्यक्ष स्पर्धा ही आठ एप्रिल ते २२ मे २०१८ दरम्यान असणार आहे. यात ज्या गावांना सहभाग नोंदवायचा आहे त्यांना तात्काळ नाव नोंदणी करून द्यावी लागणार आहे. सिने अभिनेता आमिर खान, किरण राव यांच्या पुढाकारातून होत असलेल्या या उपक्रमाबाबत जाफराबादवासियांना उत्सुकता लागली आहे. प्रशिक्षणासाठी आयोजित कार्यशाळेस जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी दीपक चौधरी, डॉ.अविनाश पोळ, नामदेव ननावरे आदी मार्गदर्शन करणार आहेत.------------उत्कृष्ट कामास लाखोंची बक्षिसेवॉटर कप स्पर्धेत उत्कृष्ट काम करणाºया गावांना राज्य पातळीवरचे पहिले बक्षीस ७५ लाख रुपये, दुसरे बक्षीस ५० लाख रुपये, तिसरे बक्षीस ४० लाख रुपये या शिवाय तालुका पातळीवर सर्वोत्तम कामगिरी करणाºया गावास १० लाख रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे. या स्पर्धेत जाफराबाद तालुक्यातुन जास्तीत जास्त गावांनी सहभाग नोंदवावा आणि आयोजित कार्यशाळेस उपस्थित राहावे, असे आवाहन गटविकास अधिकारी रमेश काळे यांनी केले आहे.---------
‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेसाठी जाफराबादची निवड !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 12:40 AM