जालना : जुना जालन्यातील रेल्वेस्थानक रस्त्यावर रविवारी भरणाऱ्या बाजारात ग्रामीण भागातून शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी आणतात. बाजारात पालिकेकडून कुठल्याही सुविधा दिल्या जात नसल्या तरी बाजार भाडेपट्टी वसुलीच्या नावाखाली विक्रेत्यांची लूट सुरू आहे. भाडेपट्टी वसुली करणाऱ्या ठेकेदाराकडून अनेकदा पैसे घेऊन पावती दिली जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
जुना जालन्यातील गांधीचमन ते रेल्वेस्थानक रस्त्यावरील आठवडी बाजारात आजूबाजूच्या गावातील शेतकरी थेट ताजा भाजीपला विक्रीसाठी आणतात. शेतकरी योग्य दरात भाजीपाला देत असल्याने शहरातील नोकरदार वर्ग शेतकऱ्यां कडून भाजीपाला खरेदीस प्राधान्य देतात. स्थानिक विक्रेतेही नेहमीच्या ठिकाणांऐजवी रविवारी बाजारात भाजीपाला विक्री करतात. सुमारे चारशेंवर विक्रेते या बाजारा भाजीपाला, किराणा, फळे व अन्य साहित्य विक्री करतात. अनेकदा स्थानिक विक्रेते शेतकऱ्यासोबत जागेवरून वाद घालतात. मोक्याच्या जागी शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीसाठी बसू दिले जात नाही. त्यामुळे शेतकरी जागा मिळेल तिथे बसतात. असे असतानाही नगरपालिकेच्यावतीने प्रत्येक विक्रेत्यांकडून ठेकेदारामार्फत तीस रुपये बाजार भाडेपट्टी वसुली केली जाते.
ठेकेदामार्फत वसुलीसाठी बाजारात येणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून बहुतांश शेतकरी विक्रेत्यांना कुठलीही पावती न देता तीस रुपये घेतले जातात. भाडेपट्टीची वसुली करणाऱ्या विक्रेत्याचे नाव पावतीवर टाकले जात नाही. याबाबत विचारणा केल्यास वसुलीसाठी येणारे कर्मचारी दमदाटी करतात. उगाच वाद नको म्हणून ग्रामीण भागातले शेतकरी निमूटपणे पैसे देतात. हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असल्याचे एका विक्रेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. लालबाग परिसरात बुधवारी भरणाऱ्या आठवडी बाजारातही अशाच पद्धतीने लूट सुरू आहे.
मग वसुली कशी ?रेल्वेस्थानक रस्त्यावर भरणारा रविवार बाजार अनधिकृत असल्याचा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे. सुरुवातीला नगरपालिका क्रीडा संकुलात भरणारा हा बाजार अनधिकृत असल्याचे सांगत पालिका प्रशासनाने उठवून दिला होता. बाजार अनधिकृतरीत्या भरवला जात असेल तर मग ठेकेदारामार्फत भाडेपट्टी वसुली कशी केली जाते, अशा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
भाडेपट्टी वसूल केली जावू नयेशेतकऱ्यांवर संकटांची मालिका सुरूच आहे.त्यामुळे शहरातील आठवडी बाजारात भाजीपाला विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांकडून कुठलीही भाडेपट्टी वसूल केली जावू नये, अशी शिवसेनेची भूमिका आहे. पावती न देता वसुली करणे हा प्रकार गंभीर असून, याबाबत चौकशी व्हायला हवी.- बाला परदेशी, नगरसेवक, शिवसेना
करार रद्द केला जाईलरविवार बाजारात वार्षिक करार पद्धतीने भाडेपट्टी वसुलीचा ठेका दिला जातो. मात्र, ठेकेदाराकडून पावती न देताच वसुली केली जात असेल तर हा प्रकार चुकीचा आहे. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यास ठेकेदाराचा वार्षिक करार रद्द केला जाईल.- संतोष खांडेकर, मुख्याधिकारी नगरपालिका.